कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ‘जे.पी.नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:48 PM2018-07-18T17:48:22+5:302018-07-18T17:50:11+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या अभियान स्पर्धेत यशस्वी शाळांना ७ लाख ३४ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचेही सांगितले.
या नव्या योजनेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ व शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.
अंबरिश घाटगे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढावा, गुणवत्ता वाढावी, भौतिक सुविधांमध्येही वाढ व्हावी या हेतूने हे अभियान घेण्यात येत असून यासाठी जिल्हा, तालुका आणि जिल्हा परिषद गटस्तरीय समिती नेमण्यात आल्या आहेत. १८ जुलै ते ३१ आक्टोबर २0१८ या कालावधीत राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन त्यातून विजेत्या शाळांची निवड करण्यात येणार आहे.
सर्व शाळांनी स्वयंमूल्यांकन करावयाचे असून ५ नोव्हेंबर ते डिसेंबर २0१८ या कालावधीत वेळापत्रकानुसार हे मूल्यांकन होऊन विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती गण स्तरावरील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटातील पहिल्या क्रमांकाला चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय दोन्ही विभागातील पहिल्या प्रत्येकी ३ शाळांना अनुक्रमे १0 हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर जिल्हा स्तरावरील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटातील पहिल्या प्रत्येकी ३ शाळांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार व २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता या विषयासाठी १६0 आणि अभियान कालावधीत राबवलेल्या उपक्रमांसाठी १४0 गुण अशी एकूण ३00 गुणांची ही स्पर्धा होणार आहे. १९ निकषांच्या आधारे ही निवड करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण समिती सदस्य प्रा. अनिता चौगुले, विनायक पाटील, रसिका पाटील, वंदना जाधव, प्रसाद पाटील, रवी पाटील, उपस्थित होते.