कोल्हापूरकरांना आवडतो एक, सहा अन् नऊ क्रमांक, फॅन्सी क्रमांकासाठी माेजतात पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:43+5:302021-07-01T04:17:43+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरकर तांबडा, पांढरा आणि वाहनप्रेमासाठी जगप्रसिद्ध आहेत. जगभरात कोणत्याही कंपनीची आणि कितीही महागडी चारचाकी रस्त्यावर आली की, ...

Kolhapurites like one, six food and nine numbers, five lakhs for fancy numbers | कोल्हापूरकरांना आवडतो एक, सहा अन् नऊ क्रमांक, फॅन्सी क्रमांकासाठी माेजतात पाच लाख

कोल्हापूरकरांना आवडतो एक, सहा अन् नऊ क्रमांक, फॅन्सी क्रमांकासाठी माेजतात पाच लाख

Next

कोल्हापूर : कोल्हापूरकर तांबडा, पांढरा आणि वाहनप्रेमासाठी जगप्रसिद्ध आहेत. जगभरात कोणत्याही कंपनीची आणि कितीही महागडी चारचाकी रस्त्यावर आली की, ती कोल्हापूरकरांच्या दारात पाहिजे म्हणजे पाहिजे. वाहनाचे अनावरण झाल्यानंतर तत्काळ त्यातील एक तरी माॅडेल येथील रस्त्यावर धावताना दिसणारच, अशी ख्याती या नगरीची आहे. वाहनप्रेमासह त्याचा क्रमांकही तितकाच तोलामोलाचा व फॅन्सी हवा. मग त्याकरिता भलेही वाहनाच्या किमतीइतकेच पैसे मोजावे लागले तरी चालतील, अशी मानसिकता येथील वाहनप्रेमींची आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत हव्या त्या क्रमांकांसाठी तब्बल साडेबारा कोटी रुपये वाहनप्रेमींनी मोजले आहेत.

कोल्हापूकर आणि वाहनप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे जितके वाहनाची किंमत नसेल तितके फॅन्सी क्रमांकासाठी पैसे मोजणारा वाहनप्रेमी येथेच मिळेल, अशी ख्याती जगभरात आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वाहनांचे क्रमांक ०१, ०६, ०९, ११, १११, २२२, ३३३, १२३, १२३४, ९९९९, १०००, ११११, ७८६, ८८८, २७२७, २३४५, ५६७, ४५४५, ४५६७, ९००९, ८१८१, ७२७२, ६३६३, अशा एक ना अनेक क्रमांकांना मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महसूल दरवर्षी वाढतच आहे. गेल्या तीन वर्षांत या कार्यालयाने साडेबारा कोटी रुपयांचा महसूल केवळ फॅन्सी क्रमांकांच्या लिलाव व थेट विक्रीतून मिळवला आहे.

सर्वाधिक मागणीचे क्रमांक

क्रमांक -०१ - ५ लाख

क्रमांक ०९, ७८६ , ९९९ - २ लाख

क्रमांक ०२, ०३, ०४, ०५, ०६, - १ लाख

तीन वर्षांतील कमाई अशी

साल क्रमांक विक्री संख्या कमाई (महसूल)

२०१९ - ९६५४ ६ कोटी ८४ लाख २० हजार

२०२०- ७२५८ ५ कोटी ४७ लाख

२०२१- २८३ २१ लाख

या क्रमांकांचा दर सर्वाधिक

०१ - ५ लाख

०९ - २ लाख

१११ - १ लाख ५० हजार

९२९२ ची क्रेझ

आमदार पी. एन. पाटील यांच्या सर्व गाड्यांचे नंबर असलेल्या ९२९२ या नंबरचीही मोठी क्रेझ आहे. त्यामुळे या नंबरसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला लोक तयार असतात. मोटारसायकल सीरीजमधील नंबर कारसाठी घेतल्यास तिप्पट शुल्क भरावे लागत असे. तसे शुल्क भरून लोकांनी ९२९२ हा क्रमांक घेतल्याची उदाहरणे आहेत. आमदार पाटील सत्तेत असोत अथवा नसोत, त्यांच्यावर व त्यांच्या आवडीच्या क्रमांकावरही प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.

...तर नंबरसाठी होतो लिलाव

एखाद्या क्रमांकाला एकापेक्षा अधिक जणांनी पसंती दर्शवून त्याचे पैसे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे भरले, तर त्या क्रमांकासाठी लिलाव आयोजित केला जातो. त्यात ज्याचा दर जास्त त्याला तो क्रमांक दिला जातो.

- एक क्रमांकाकरिता विशेषत: सर्वांना हवा असतो. अशावेळी या क्रमांकाकरिता अधिक बोली जो बोलेल त्या वाहनधारकास तो क्रमांक बहाल केला जातो. ही पद्धत चारचाकीसह दुचाकी वाहनांकरिता अवलंबिली जाते.

-कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांसाठी एमएच-०९ हा कोड परिवहन आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे अनेक वाहनधारकांना नऊ क्रमांकच हवा असतो. याशिवाय बेरीज नऊ येण्यासाठी १८, २७, ८१ अशा क्रमांकांनाही मागणी अधिक आहे. याशिवाय न्यूमराॅलाॅजीनुसार ६, ९ अशा क्रमांकांना विशेष स्थान आहे. त्यामुळेही या क्रमांकांना एकापेक्षा अनेकजण पसंती दर्शवितात आणि त्यातून क्रमांकासाठी लिलाव होतो.

कोरोना काळात हौसेला मोल नाही

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या वाहनप्रेम आणि वाहन क्रमांकावरील प्रेम काही केल्या आटलेले नाही. मागील वर्षी २०२० ला ७२५८ प्रकरणांतून ५ कोटी ४७ लाखांचा महसूल यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयास मिळाला. यंदा दुसऱ्या लाटेनंतर यात काहीअंशी फरक पडला आहे. २०२१ मेपर्यंत २८३ प्रकरणांतून २१ लाख रुपयांचा महसूल आतापर्यंत मिळाला आहे. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर वाहन खरेदी पुन्हा वेग घेणार असून, त्यातून हव्या त्या फॅन्सी क्रमांकांसाठी पुन्हा कोटींची उड्डाणे कोल्हापूरकर घेणार आहेत, असा अंदाज वाहन व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.

कोट

गेल्या तीन वर्षांत साडेबारा कोटी रुपये केवळ फॅन्सी क्रमांकांच्या लिलाव व विक्रीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयास महसूल रूपाने मिळाले आहेत. एकापेक्षा अधिक जणांना एकच क्रमांक हवा असल्यास त्या क्रमांकाचा लिलाव केला जातो. जो जास्त दर देईल त्याला तो क्रमांक दिला जातो.

- डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

Web Title: Kolhapurites like one, six food and nine numbers, five lakhs for fancy numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.