कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता बुधवारी निघालेल्या मोर्चावेळी रेल्वे स्थानक परिसरातील टपरी उध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेल्या श्रीमती शोभा राजाराम गायकवाड (रा. कनाननगर) यांच्या मदतीसाठी गुरुवारी अनेक हात पुढे आले. त्यातून त्यांच्या टपरीसह आयुष्यही उभे राहण्यास मदत झाली. सोशल मीडियावरील डॉ. रासकर मित्रपरिवाराने ‘लोकमत’ शहर कार्यालयात येऊन गायकवाड कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.पतीच्या अकाली निधनामुळे शोभा गायकवाड यांनी दोन मुलांसह संसाराचा गाडा चालविण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात चहा-नाष्ट्याची टपरी सुरू केली. गेली काही दिवस साहित्य आणण्यासाठी पैसे नसल्याने टपरी बंद ठेवली होती. मात्र, घरमालकांकडून काही पैसे उसने घेऊन मंगळवारी सकाळी सर्व साहित्य टपरीत भरले.
मात्र, आंदोलकांनी बंद टपरीही उलथवून टाकली. उसने पैसे घेऊन भरलेले सर्व साहित्य रस्त्यांवर पसरल्याने गायकवाड कुटुंबीय हतबल झाले. या घटनेची माहिती कळताच सर्वजण मदतीसाठी धावून आले.
‘आम्ही कोल्हापुरी’ या सोशल मीडियावरील ग्रुपचे सदस्य गणी आजरेकर, हर्षल सुर्वे, आशपाक आजरेकर,शाकीर शेख, अजिंक्य पाटील यांच्यासह बंडा साळोखे, महेश उरसाल यांनी गायकवाड कुटुंबियांना चहा पावडर, साखर, कपबशा, बॅटरीसह आर्थिक मदत केली.डॉ. देवेंद्र रासकर मित्रपरिवारांने सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रुपवरील अनेकांनी आर्थिक मदत केली. या ग्रुपच्यावतीने ‘लोकमत’ शहर कार्यालयात ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते गायकवाड कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील, ग्रुपचे डॉ. रासकर, राहुल राजशेखर, राजश्री सूर्यवंशी, प्रसाद गवस, मनोज सोरप, विकास कांबळे आदी उपस्थित होते. कोल्हापूरकरांच्या माणुसकीच्या मदतीने गायकवाड कुटुंबीय भारावून तर गेलेच; पण दिवसभर त्यांची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
माणुसकी मदत केंद्रमंगळवारी झालेल्या कोल्हापुरातील दंगलीमध्ये अनेक कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी ‘आम्ही कोल्हापुरी’ या सोशल मीडियावरील ग्रुपने पुढाकार घेऊन ‘माणुसकी मदत केंद्र’ सुरू केले आहे.
या ठिकाणी नागरिकांनी नुकसानीचे फोटो आणि अर्ज जमा करायचे आहेत. त्यांना मदत केली जाईल तसेच ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी व नुकसान झालेल्या नागरिकांनी मदतीसाठी मुस्लिम बोर्डिंग (दसरा चौक), शिवसेना कार्यालय (शनिवार पेठ), अजिंक्यतारा कार्यालय (ताराबाई पार्क), बजरंग दल शाखा, युनिक मेडिकल (महाद्वार रोड), कोल्हापूर प्रेस क्लब येथे भेट द्यावी, असे आवाहन ग्रुपचे सदस्य हर्षल सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.