कोल्हापूर : शहरातील पंचगंगा नदीकिनारा, रंकाळा परिसर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शासकीय विश्रामगृह, कसबा बावडा; तर पुईखडी परिसरात दाट धुके पडत असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाही धुक्यात हरविल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहण्यास मिळाले. त्यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे.दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान व कोजागिरी पौर्णिमेनंतर हळूहळू थंडीची सुरुवात होते. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून थंडीला सुरुवात झाल्याने रात्री दोननंतर रस्त्यांवर दवबिंदूंची सुरुवात होते.
हळूहळू करीत पहाटे चारच्या सुमारास अक्षरश: पंचगंगा नदी, रंकाळा तलावाचा परिसर, साने गुरुजी वसाहतीचा परिसर, कळंबा परिसर, शिवाजी विद्यापीठाचा परिसर तर नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कसबा बावड्याचा परिसर, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गासह अन्यत्रही धुके पडत आहे. या दाट धुक्याचा आनंद लुटण्यासाठी बालगोपालांसह वृद्धांचीही फिरण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.
अंगावर शाल, मफलर घेऊन ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही मोठ्या प्रमाणात या दाट धुक्याचा आनंद घेण्यासाठी पहाटे फिरावयास बाहेर पडताना दिसत आहेत. या दाट धुक्यामधून वाट काढतच वाहनांचा प्रवास सुरू होता. दाट धुक्यामुळे दोन फुटांवरीलही काही दिसत नव्हते. सूर्यनारायणाचे दर्शनही सकाळी साडेनऊनंतर झाले.
चहाच्या गाड्या फुलल्यायंदा उशिराच बोचऱ्या थंडीस सुरुवात झाली आहे. त्यातच दाट धुके असे आल्हाददायक व आरोग्याला पोषक वातावरण असल्याने पहाटेस फिरावयास गेलेले नागरिक फिरणे झाल्यानंतर चहाच्या गाडीवर चहा पिण्यासाठी थांबल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते.