सचिन यादवकोल्हापूर : फुटबॉल, रांगडा खेळ म्हणून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचाच. पेठा-पेठांतील ईर्ष्येने फुटबॉल लाल मातीशी घट्ट झाला; मात्र गेल्या काही फुटबॉल चषक सामन्यात खिलाडूवृत्तीऐवजी मारामारी, राडा, धुश्मचक्रीचे प्रकार झाले. गेल्या पाच वर्षांत पोलिसांनी १५० हून अधिक खेळाडूंवर गुन्हे दाखल केले आहेत. ज्या-त्या सामन्याच्या गैरवर्तन केलेल्या खेळाडूंवर बंदी घातल्याचे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे म्हणणे आहे.गर्दीत गोंधळ घालायला, दगडफेक करायला धाडस लागत नाही. एकाने दगड भिरकावला की, सारेच गर्दीच्या मानसिकतेवर स्वार होऊन दंगलीत सहभागी होतात. याचा त्रास मात्र ज्याचा या वादाशी संबंध नाही, अशा सर्वसामान्य फुटबॉलप्रेमींना होत आहे. गेल्या पाच वर्षांत पेठांतील पारंपरिक फुटबॉल संघाच्या सामन्यात दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.पेठांतच नव्हे तर गल्लीबोळात फुटबॉलची चर्चा आहे; पण फुटबॉलवर जे प्रेम आहे, त्यापेक्षा आपल्या समर्थकांवर जादा प्रेम दाखवले जात असल्याने फुटबॉल सामन्यात मारामारी, राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्यात मारामारी होणार, याची खात्री समर्थकांना झाली आहे. समर्थकांवर वचक बसविण्यात पोलिस यंत्रणाही कमी पडत आहे. अनेकदा या वादाचे पडसाद शहरातही उमटतात.नियम धाब्यावरगुन्हा करणाऱ्यांना समान शिक्षा करण्याचे धाडस केएसएने दाखविण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात एका मंडळावर कारवाई केली आणि दुसऱ्याच दिवशी ती मागे घेतली. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या मंडळाच्या खेळाडूवर आधी कारवाई करा मग आमच्यावर करा, असा जाब काही संघ विचारत आहेत.
मॅच संपल्यावर बघतो‘तुला मॅच संपल्यावर बघून घेतो’, म्हणण्याची जी स्पर्धा लागली आहे, त्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होत आहे. तो थांबला तरच कोल्हापुरातल्या गल्लीबोळात कौतुकाचा विषय ठरलेले फुटबॉलपटू देशपातळीवर नक्कीच चमकतील.
पाच वर्षांतील काही प्रमुख घटना
२७ मे, २०२२ : पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळात शाहू चषकात राडा. त्यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.२३ फेब्रुवारी, २०२३ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बीजीएम स्पोर्ट्स विरुद्ध झुंझार क्लबमध्ये झालेल्या सामन्यातील राड्याप्रकरणी खेळाडू आणि समर्थकांवर अशा ५० जणांवर गुन्हे.१६ एप्रिल, २०२३ : शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लबमध्ये झालेल्या सामन्यात पंचाच्या अंगावर धाऊन गेल्याने राडा. ७० जणांवर गुन्हे दाखल.२४ डिसेंबर २०२३ : केएसए शाहू छत्रपती फुटबाॅल लिग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळाच्या खेळाडू समर्थकांत राडा. मैदानाबाहेर झालेल्या राड्या प्रकरणी संदीप सरनाईक (रा. मंगळवार पेठ) याच्यासह २५ जणांवर गुन्हा.७ एप्रिल, २०२४ : शिवशाही चषकात सामन्यात राडा केल्याप्रकरणी शिवाजी आणि पीटीएमच्या चार खेळाडूंवर गुन्हा दाखल.
सार्वजनिक ठिकाणी दंगा घातलेल्या आणि मारामारी केलेल्या चार खेळाडूंवर गुन्हे दाखल आहेत. येत्या १५ दिवसांत न्यायालयात हे प्रकरण दाखल होईल. -संजीवकुमार झाडे, पोलिस निरीक्षक जुना राजवाडा
वादग्रस्त सामन्यातील खेळाडूंवर बंदी घातली आहे. ज्या-त्या सामन्यात झालेल्या गैरप्रकार करणाऱ्यांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली आहे. - माणिक मंडलिक, सचिव, केएसए