पारा ४१ अंशावर : उकाड्याने कोल्हापुरकरांचा रविवार हॉट, रात्रीचीही वाढली तगमग
By संदीप आडनाईक | Published: April 28, 2024 07:15 PM2024-04-28T19:15:45+5:302024-04-28T19:15:55+5:30
नागरिक हैराण, किमान तापमानातही झाली वाढ
कोल्हापूर: गेल्या दोन दशकात प्रथमच यंदाचा एप्रिल महिना कोल्हापुरकरांसाठी सर्वाधिक हॉट ठरला आहे. रविवारचा कमाल तापमानाचा पाराही ४१ पर्यंत गेल्याने तो हॉट रविवार ठरला आहे. दिवसा उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे. फॅन, एसी, कुलरलाही या वाढत्या तापमानाने जुमानलेले नाही. या महिन्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली आहे.
कोल्हापूर मुळातच आल्हाददायक हवेसाठी प्रसिध्द आहे. परिसरातील पन्हाळा, आंबा, राधानगरी, दाजीपूरसारखी ठिकाणे थंड हवेची म्हणूनच ओळखली जातात. मात्र यंदा या ठिकाणचे तापमानही वाढले आहे. यंदाचा एप्रिल महिना तर सर्वाधिक तापमानाचा महिना म्हणूनच नोंद होत आहे. रात्रीही उकाडा वाढत असल्याने तगमग वाढत आहे. उष्णतेच्या झळा अंगाला झोंबू लागल्या आहेत. घामाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. विदर्भातील वातावरणाचाच अनुभव येथील नागरिक घेत आहेत, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरु नये.
निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे म्हणतात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरसह १० जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ डिग्री सेल्सिअस ग्रेडने झालेल्या वाढीमुळे महिनाअखेर दिवसा आणि रात्रीही उकाड्यात वाढ होणार आहे.
सकाळपासून सायंकाळपर्यंत बाहेर पडणे टाळा
उष्णतेच्या झळांमुळे शास्त्रज्ञांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत बाहेर पडणे टाळावे असा सल्ला दिला आहे.
तापमानाचा आलेख चढाच
गेल्या कांही वर्षांपासून कोल्हापुरात एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान वाढतेच आहे. २००० ते २०१० या काळात एप्रिलमध्ये सरासरी तापमान ३६ अंश सेल्सिअस असे होते. २०११ ते २०२० या काळात हे तापमान ३७ अंशापर्यंत वाढले. या दशकातील पहिल्या चार वर्षांत सरासरी तापमानाचा पाराही आता ४१ अंशापर्यंत वाढला आहे.
किमान तापमानातही चढउतार
२७ अंश इतके रविवारचे किमान तापमानही वाढल्याने ते या महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. दोन दिवसांपासून पुन्हा उकाडा वाढला आहे. बुधवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात घट झाली, आता पुन्हा यात वाढ होत आहे.
पूर्व मोसमी हंगाम अजूनही ५० दिवस बाकी आहे. त्यामुळे अवकाळी, उष्णतेची लाट आणि चक्रीवादळसारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता आहे. इराण, अफगाणिस्थान, दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात उष्ण वाऱ्याचे वहन होत आहे.
-माणिकाराव खुळे, निवृत्त हवामान तज्ञ, आयएमडी, पुणे.