क्रांती दिन विशेष: शरीरात सुया टोचल्या, जीभ हासडली पण तोंड नाही उघडले, कोल्हापुरातील निवृत्ती आडूरकरांनी देशासाठी रक्त सांडले
By संदीप आडनाईक | Published: August 9, 2023 12:57 PM2023-08-09T12:57:18+5:302023-08-09T12:58:05+5:30
कोल्हापूरकरांनी चौकाला, रस्त्यालाही दिले नाव
संदीप आडनाईक
कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात पुढाकार घेणाऱ्या शहरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती आडूरकर (सुतार) हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झाले. अमानुष अत्याचारात जिवाचे मोल देऊन सहकाऱ्यांचे नाव इंग्रजांना न सांगणाऱ्या आडूरकर यांचे समर्पण मोठे आहे. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पेठेतील चौकाला तसेच त्यांचे घर असलेल्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आज क्रांतिदिनी आणि स्वातंत्र्यदिनी या हुतात्म्याला आदरांजली वाहिली जाते.
ब्रिटिश सैनिकांच्या पन्हाळा येथील छावणीवर एप्रिल १९३७ मध्ये बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न काही क्रांतिकारकांनी केला. त्यावेळी पेठेत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निवृत्ती आडूरकर यांनी स्फोट घडविण्याची जबाबदारी पूर्णत्वास नेली. प्रजा परिषदेचे नेते भाई माधवराव बागल यांची शिवाजी पेठेतील सभा उधळून लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आडूरकरांनी हाणून पाडला.
१० ऑक्टोबर १९४२ मध्ये फेरीस मार्केटसमोरील गव्हर्नर सर वेलस्ली विल्सनचा पुतळा विद्रूप करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी १६ महिन्यांचा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. मात्र, पन्हाळा बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचा सुगावा जेव्हा पोलिसांना लागला तेव्हा त्यांचा तुरुंगात अमानुष छळ करण्यात आला.
हातपाय पकडून फरशीवर आपटले
शरीरात सुया, दाभणे टोचून शरीर काळेनिळे केले. हातपाय पकडून चार पोलिसांनी त्यांना फरशीवर आपटले होते. माहिती मिळवण्यासाठी सांडशीने त्यांची जीभ हासडली होती; पण त्यांनी एका शब्दाने कोणाचेही नाव घेतले नाही. अतिरक्तस्रावाने प्रकृती गंभीर बनली होती. तुरुंगातच मृत्यू झाल्यास उद्रेक होईल, म्हणून इंग्रजांनी ७ जुलै १९४३ या दिवशी सरकारी रुग्णालयात दाखल केले.
९ ऑगस्टलाच मृत्यू
दरवर्षी ९ ऑगस्टला मोठा मोर्चा काढण्याचा त्यांचा आग्रह असायचा; परंतु इंग्रजांनी १४४ कलम लागू करून जमावबंदी करून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि ९ ऑगस्ट १९४३ या दिवशीच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेलाही जमावबंदी लागू केली होती; पण ती झुगारून शिवाजी पेठेतून भव्य अंत्ययात्रा निघाली होती.