जिल्ह्यात कमी लसीकरण हे तीनही मंत्र्यांचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:25+5:302021-06-30T04:16:25+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक फेऱ्या मारत आहेत. परंतु लस कमी येत ...
कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक फेऱ्या मारत आहेत. परंतु लस कमी येत आहे. वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्याला जादा लस नेत असताना कोल्हापुरात लस मिळत नाही हे तीनही मंत्र्यांचे अपयश असल्याची टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुबलक प्रमाणात लस मिळाली नाही तर या मंत्र्यांच्या घरासमोर जनतेतर्फे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची आकडेवारी मांडत भाजपने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तीनही मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हणाले, हसन मुश्रीफ कोल्हापुरात १०० किलो वजन असल्यासारखे दाखवतात. मात्र वरती त्यांचे पावशेरही वजन नाही हे यातून सिद्ध होते. मुंबई आणि पुण्याची लोकसंख्या कितीतरी पट जास्त असताना तेथे २०० आणि ४०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. तर कोल्हापुरात हाच आकडा दोन हजारावर जात आहे. हे मंत्र्यांचे, प्रशासनाचे अपयश आहे.
महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकाेडे म्हणाले, याच गतीने लसीकरण झाल्यास जिल्ह्याचे लसीकरण व्हायला दोन वर्षे लागतील. अशोक देसाई म्हणाले, २३ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी रोज ५० हजार डोसची मागणी केली होती. मग ती पूर्ण का होत नाही. अजित ठाणेकर म्हणाले, कोल्हापुरातील पहिला डोस घेतलेले ५० हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये यावेळी उपस्थित होते.