ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कची जमीन मोजून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:11+5:302021-09-24T04:30:11+5:30
कोल्हापूर : येथील रमणमळा येथील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कची सुमारे साडेचार एकरची जमीन डॉ. डी. वाय. पाटील समूहाच्या ...
कोल्हापूर : येथील रमणमळा येथील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कची सुमारे साडेचार एकरची जमीन डॉ. डी. वाय. पाटील समूहाच्या ज्ञानशांती कंपनीला सहल केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी दिली होती. देताना पार्कची जेवढी जमीन होती तितकीच आता महापालिकेने मोजून घ्यावी, अशी मागणी गुरुवारी माजी महापौर सुनील कदम, ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. ज्ञानशांतीने ताबा सोडला तरी आम्ही पार्क चालवण्यास घेणार नाही, कारण तो आमचा धंदा नाही. महापालिकेने निविदा मागवून त्याचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, पार्कमधील काही जागा राजकीय ताकदीचा गैरवापर करून अन्य एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या नावावर केली आहे. त्याचीही चौकशीची मागणी करणार आहे; पण आम्ही महापालिकेकडे पार्कची जेवढी जमीन कराराने देताना होती, तेवढीच आता आहे काय, का कमी झाली आहे, याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. पार्कसंबंधीचा करार करताना जाणीवपूर्वक संभ्रम ठेवून घरफाळा थकवण्यात आला आहे; पण तो फाळा त्यांना भरावाच लागेल. आम्ही तक्रारी केल्या म्हणून जागा परत केली, असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु त्यांनी जागा परत केली म्हणजे महापालिकेवर मेहेरबानी केली, असे नव्हे. आम्ही केलेल्या चौकशीच्या मागणीमुळेच त्यांना जागा परत करावी लागली व आता हा पार्क मोकळा श्वास घेऊ लागला आहे.