भूस्खलन होऊन शेती पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची मोठी आर्थिक हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:02 PM2022-08-14T14:02:27+5:302022-08-14T16:00:20+5:30
अतिरीक्त पावसाचा परिणाम; गतसाल ही या गावात झाले होते भुस्खलन
धामोड - पिलावरेवाडी (ता. राधानगरी) येथे गेल्या दोन आठवडयापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. त्यातच या पावसाने पिलावरेवाडी गावानजीक 'घोळ' नावाच्या शेतात मोठे भुस्खलन होऊन शिवारातील भात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २ ते २.५ हेक्टर क्षेत्रावरील भात पिक घसरत जाऊन पिक गडप झाले आहे. या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले, ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली असून. नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी यांचेही नुकसान झाले आहे.
केळोशी बु. नजीकच्या पिलावरेवाडी येथील 'घोळ' नावाच्या शिवारा दरम्यान मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग तिन ते चार फुटाने खाली सरकला आहे. त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तीन शेतकऱ्यांची जवळपास अडीच हेक्टर जमीन तीन ते चार फुटाणे खचून ओढ्याकडील बाजूला सरकत गेली आहेत . तर या खचलेल्या जमिनीचा काही भाग दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरात गेल्या आठ दिवसात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या नदी नजीकच्या विहिरीव विद्युत पंपांचेही नुकसान झाले आहे.
सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन तलाठी रणजीत पाटील,सरपंच के .एल. पाटील, ग्रामसेवक बागडी, कृषी सहाय्यक तानाजी परीट, यु.जी.नाधवडेकर, कोतवाल संतोष पाटील, पोलास पाटील शशिकांत दिघे पंचनाम करून पुढील कार्यवाही साठी पाठवला आहे. गतसाली या परिसरात ८९५ मिलिमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका दिवसात पडल्यामुळे या परिसरातील माळवाडी ,केळोशी, आपटाळ,माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते . यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .