भूस्खलनाची आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:42+5:302021-08-12T04:29:42+5:30
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. राधानगरी तालुक्यालाही याचा जोरदार फटका बसला. ...
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. राधानगरी तालुक्यालाही याचा जोरदार फटका बसला. तळगाव, दुर्गमानवाड, कुंभारवाडी, कुकुडवाडी, खिंडी व्हरवडे, कुडुत्री, शिरगाव तसेच कोनोली-कुपलेवाडी, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. कुपलेवाडी येथे तर भूस्खलनामध्ये जीवितहानी झाली.
दरम्यान, तळगाव परिसरातील भोगूलकरवाडी, भुजंग पाटीलवाडी येथे मोठे डोंगर कोसळून शेतजमिनीमध्ये आल्याने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तसेच जवळपास पंधरा विहिरी जमिनीमध्ये गडप झाल्या असून काही ठिकाणी नदी, विहिरींवरील इंजिने गाडली गेली आहेत. भुजंग पाटील वाडी येथील पाणीपुरवठ्याच्या टाक्याही भूस्खलनात गाडल्या गेल्या. भूस्खलनामुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकरांनी या परिसराला भेट दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी त्यांना धीर देत राज्य शासनाच्या वतीने नुकसान भरपाई तातडीने मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, कल्याणराव निकम, संजय पाटील, विश्वास राऊत, संदीप पाटील, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळी
तळगाव (ता. राधानगरी) येथे भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी आमदार प्रकाश आबिटकर यांनी संवाद साधला. शेजारी अभिजित तायशेटे उपस्थित होते.