कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणारे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट स्थलांतरित करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. व्यापाऱ्यांनी टेंबलाईवाडी येथे स्थलांतर व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाने रेटा लावला असून आज, सोमवारी धान्य मार्केटमध्ये येणाºया मोठ्या वाहनांची नाकाबंदी केली जाणार आहे. व्यापाऱ्यांची मानसिकता पाहता त्यांचा स्थलांतराला विरोध असून ते पालकंमत्री सतेज पाटील यांना भेटून गा-हाणे मांडणार आहेत.
कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी धान्य मार्केट स्थलांतरित करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे. टेंबलाईवाडी येथे समितीच्या मालकीची २२ एकर जागा असून त्यामध्ये २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले आहेत. गेली १८ वर्षे प्लॉट देऊन झाले तरी केवळ २८ व्यापा-यांनी तिथे बांधकाम केले आहे. उर्वरित माळ मोकळा पडला आहे. समितीने त्या ठिकाणी सोयीसुविधा पुरवल्या आहेत. मात्र व्यापारीच जात नाहीत.
महापालिका व पोलीस प्रशासनाने मार्केट स्थलांतरितासाठी प्रयत्न सुरू केले असून व्यापा-यांना टेंबलाईवाडी येथे जाण्यासाठी आज, सोमवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र एकूणच व्यापा-यांची मानसिकता आणि तिथे बांधकामे पूर्ण नसल्याने मार्केटच्या स्थलांतराची शक्यता धूसर आहे.व्यापारी आज, सोमवारी स्थलांतरित होणार नाहीत, याचा अंदाज महापालिका व पोलीस प्रशासनाला आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन लक्ष्मीपुरी मार्केट बॅरिकेड लावून मोठ्या वाहनांना रोखण्याची शक्यता आहे.
‘मनपा’ला कायदेशीर कारवाईबाबत मर्यादाधान्य मार्केटमधील एकूण ५४ गाळ्यांपैकी २२ गाळे महापालिकेच्या मालकीचे आहेत. त्यामुळे महापालिकेने दबाव वाढविला असला तरी कायदेशीर बाबींचा विचार केला तर मात्र एकदम व्यापाऱ्यांवर कारवाई करणे तसे अडचणीचे ठरू शकते.