बगलबच्च्यांना सत्ता देण्यासाठीच नेत्यांची धडपड--शेतकरी संघ निवडणूक रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2015 12:53 AM2015-09-22T00:53:58+5:302015-09-22T00:55:19+5:30
पी. डी. पाटील यांचा आरोप : विकासाचा अजेंडा नाही; मोहिते-नेसरीकरांच्या स्वप्नातील संघ उभारू
राजाराम लोंढे - कोल्हापूर शेतकरी संघाची सध्याच्या परिस्थिती नाजूक आहे, यामधून संघाला बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांकडे कोणताही अजेंडा नाही. केवळ संघाला राजकीय अड्डा बनविण्यासाठी व बगलबच्यांना सत्ता देण्यासाठीच या मंडळींना सत्ता हवी असल्याचा आरोप संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तात्यासाहेब मोहिते व बाबा नेसरीकर यांच्या स्वप्नातील संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पाटील म्हणाले, संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिलो; पण नेत्यांच्या डोक्यात काही वेगळेच होते. त्यांनी सवयीप्रमाणे शेवटपर्यंत झुलवत ठेवले. राजकीय द्वेषापोटी आम्हा मंडळींना त्यांनी बाजूला ठेवले असेल, पण ज्या घराण्याने संघाच्या उत्कर्षासाठी जिवाचे रान केले, त्या मोहिते घराण्याला बाजूला करण्यामागचा हेतूच समजला नाही. आतापर्यंत संघात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. केवळ राजकीय हेतूने संघ ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असल्यामुळे सभासदांनी आम्हाला पॅनेल करण्याचा रेटा लावला. निवडणूक लागण्यासारखी संघाची परिस्थिती नव्हती, भविष्य निर्वाह निधीची गुंतवणूक चुकीची झाल्याने त्यामध्ये ४० ते ५० लाखांचा दुरावा आहे. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केल्याने तो ५० लाख फरक द्यावा लागणार आहे. संघाकडील शिल्लक पाहिली तर सध्या व्यवहार सुरळीत चालण्यासाठी चार कोटींची गरज आहे. सभासदांची संघावर कमालीची श्रद्धा आहे. आम्ही सत्तेवर असताना कर्जामुळे संघ शॉर्टमार्जिनमध्ये केला, त्यावेळी सभासदांनी घरी बोलावून आमच्याकडे ठेवी ठेवल्या. शेतकरी, ग्राहकांच्या हितासाठी संघ वाचणे गरजेचे आहे.
संघ ही मार्केटिंग संस्था आहे, व्यवसाय वाढला तरच नफा वाढेल. त्यासाठी नियोजन करावे लागेल. सत्तेत आल्यानंतर जिवाचे रान करून संघाला गतवैभव मिळवून देवू. विरोधी पॅनेलमध्ये संघ वाचवून चालविण्यासाठी कोणतीही दूरदृष्टी नाही.
संघाचा राजकीय अड्डा करण्यासाठीच विरोधकांना सत्ता हवी आहे, पण सभासद जाणकार व सूज्ञ आहेत. या मंडळींचा हेतू त्यांनी ओळखला असून मतपेटीद्वारे त्यांचे मनसुभे उद्ध्वस्त करतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
नेतृत्व नसल्यानेच मोहितेंना निमंत्रण
संघ चालविण्याची क्षमता नसणारे उमेदवार पाहून वसंतराव मोहिते बाजूला झाले. मोहिते यांना स्वीकृत म्हणून घेऊन त्यांच्याकडे संघाचा कारभार सोपविण्याची तयारी हसन मुश्रीफ यांनी दाखविली आहे. त्यावरून त्यांच्याकडे संघ चालविण्यासाठी सक्षम नेतृत्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोलाही पाटील यांनी हाणला.
मग व्यक्तिगत प्रचार का? सत्तारूढ पॅनेलमधील उमेदवारांना एकमेकांवर विश्वास नाही. त्यांच्यात कमालीची संभ्रमावस्था असून त्यांनी व्यक्तिगत प्रचार सुरू केल्याची टीका पी. डी. पाटील यांनी केली.
संघाचा ‘बैल’ धावेल ‘बैल’ हे श्रमाचे व प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. संघाचा बैल अशक्त झाला आहे, आगामी पाच वर्षांत पुनर्वैभव मिळविल्यानंतर बैल धावू लागेल, असे पाटील म्हणाले.
सत्ता द्या हे करतो....
आर्थिक शिस्त व नियोजन
काटकसरीचा व पारदर्शक कारभार
शाखांना बळकट करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.
विक्री वाढीसाठी प्रयत्न
कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू
गोठवलेले पगार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील
(उद्याच्या अंकात : सत्तारुढ पॅनेलचे प्रमुख श्रीमती शोभना शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव जाधव यांची भूमिका)
कोल्हापूरच्या सहकारी चळवळीतील नावाजलेली संस्था अशी ओळख असलेल्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत आहे. त्यानिमित्त रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनेल प्रमुखांच्या मुलाखती आजपासून...