लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या उभारणीमुळे हमिदवाडा परिसरात औद्योगिक क्रांती साधली गेली आहे. आता पाणी पुरवठा संस्थेची स्थापना करून वेदगंगा नदीवरून पाणी योजनेच्या माध्यमातून या परिसरातील इंच अन् इंच जमीन ओलिताखाली आणून हरितक्रांती साधण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
हमीदवाडा (ता. कागल) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर पाणी योजनेच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुमन विलास जाधव होत्या.
सरपंच जाधव म्हणाल्या, या योजनेसाठी एक कोटीचा निधी मंजूर असून, सर्व स्थानिक नेतेमंडळी, मंडळांचे कार्यकर्ते, सर्व सदस्य, अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने ही अडथळ्यांची शर्यत पार करत आहोत.
प्रास्ताविक उपसरपंच के. बी. बुरुटे यांनी केले. यावेळी सभापती पूनम महाडिक, बाबुराव बोड्डे, नागू कोल्हे, संजय मोरे, विठ्ठल भोसले, विष्णू मोरे, युवराज हासोळे, अनिल शेळके, डॉ. कृष्णात मत्तिवडेकर, स्वप्नील मगदूम, ग्रामसेवक एन. आर. मगदूम, उपअभियंता तोरसे, अनंत पोवार, सुभाष पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :
फिल्टर हाऊसही उभारू
शुध्द आणि शाश्वत पाणी मिळावे, यासाठी वेदगंगेतून पाणी योजनेला हमीदवाडा येथील ग्रामस्थांनी एकमुखी सहमती दिली. ही बाब कौतुकास्पद आहे. याचा लाभ यापुढे अनेक पिढ्यांना होणार आहे. येथे फिल्टर हाऊससह गावातील अंतर्गत योजनेच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध राहण्याचे अभिवचनही मंडलिक यांनी दिले.
छाया : हमीदवाडा गावासाठी वेदगंगा नदीवरून होणाऱ्या पाणी योजनेचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांनी केले. यावेळी पूनम महाडिक, सुमन जाधव, के. बी. बुरुटे, शांतीनाथ मगदूम आदी उपस्थित होते.
(छाया साताप्पा चव्हाण, बेनिक्रे)