कोल्हापूर : राजकारण करणारे बरेच जण आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांची चळवळ करणाऱ्या नेतृत्वाची गरज जास्त आहे. त्यामुळे ही चळवळच पुढे घेऊन जावूया. आता कोणत्या पक्षाच्या नादाला नव्याने लागायला नको, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून व समाजातूनही उमटली. स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यावर ही प्रतिक्रिया उमटली. लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. आता तो माझ्यासमोरचा प्राधान्यक्रम नाही, त्यामुळे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्वत: शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून भवितव्यातील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
शेट्टी गेल्या कांही दिवसांपासून महाविकास आघाडीबद्दल नाराज आहेत. त्यातच त्यांनी पंढरपूर विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! असे ट्विट केले होते. महाविकास आघाडीतून त्यांचे विधान परिषदेसाठी नाव पाठवण्यात आले आहे; परंतु त्यास अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. या सर्व अस्वस्थेतून ते महाविकास आघाडीतून लांब जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीने खळबळ उडवून दिली. बातमी वाचून सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेट्टी यांना फोन आले. काहींनी लोकमतकडेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सध्याच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची समाजाला जास्त गरज आहे. राजकीय पक्ष स्वार्थापोटी संघटनेचा वापर करतात व नंतर फसवतात. त्यामुळे आता कोणताच नवीन घरोबा करायला नको. केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना संघटना म्हणून आपण कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या भूमिकेला देशात सर्वात अगोदर विरोध करण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षाची संगत अजिबात करायला नको. यापूर्वी २००९ ला ज्याप्रमाणे आपण संघटना म्हणून लढलो आणि लोकांना भिडलो, तसेच राजकारण यापुढेही करूया, असा साधारण व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा सूर राहिला.