शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा
By admin | Published: April 23, 2015 12:01 AM2015-04-23T00:01:11+5:302015-04-23T00:33:43+5:30
व्ही. एम. चव्हाण : शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्रीय ग्रंथांचे प्रकाशन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा. शिवाय त्यावर उपाययोजना सुचविल्या जाव्यात. विद्यापीठातील संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना विशेषत: शेतकऱ्यांना व्हावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले.
अर्थशास्त्र विभागातर्फे डॉ. हिंदुराव संकपाळ यांच्या ‘हायर एज्युकेशन थ्रू अर्न अॅन्ड लर्न’, डॉ. विजय पाटील यांच्या ‘इन इकॉनॉमिक असेसमेंट आॅफ जवान वेल्स अंडर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इन सांगली डिस्ट्रीक्ट’ या ग्रंथांचे प्रकाशन मानव्यशास्त्र सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निर्दालन अशा संशोधनपर ग्रंथांमधून निश्चित होणार आहे. प्रकाशित ग्रंथांपैकी एका ग्रंथामध्ये कोरड्या जमिनींचा आणि दुसऱ्या ग्रंथांत कोरड्या घशाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यासाठी प्रयत्न आणखी जोमाने करण्याची गरज आहे.
डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, दोन्ही ग्रंथांचे स्वरुप कॅपिटल फॉर्मेशनचे आहे. जगाच्या विकासामधील सगळ्या अनुभवांमध्ये भांडवल हा मूळ गाभा आहे. विहीर हे विकासाचे प्रतीक आहे. भांडवल विकासाचे साधन आहे. गेल्या ५० वर्षांपासून सिंचनाचे प्रमाण १७ ते १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. महाराष्ट्राची ७३ ते ८४ टक्के शेती कोरडवाहू आहे. वाढलेल्या सिंचनाचे श्रेय केवळ शेतकऱ्यांना द्यावे लागेल, सरकारला नाही.ांशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहोचला पाहिजे.
डॉ. भोईटे म्हणाले, समाजघटकांच्या सद्य:स्थितीचा विचार करणारे हे दोन ग्रंथ आहेत. ते विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत. यावेळी डॉ. विजय पाटील, हिंदुराव संकपाळ यांची भाषणे झाली. प्रा. विजय ककडे यांनी स्वागत केले. डॉ. एम. बी. देशमुख यांनी आभार मानले.