नवी दिल्ली / कोल्हापूर :सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरू करावे, ही मागणी खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली होती. त्यासंदर्भात मंगळवारी पुरातत्त्व विभागाच्या महानिदेशक उषा शर्मा यांनी बोलाविलेल्या बैठकीत, शिवराजेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासंदर्भात सर्व परवानग्या देण्यात आल्या. तसेच पन्हाळागडावर ‘लाईट अॅन्ड साऊंड शो’ सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली या मंदिराचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकर सुरू केले जावे, असे स्पष्ट निर्देश संभाजीराजे यांच्या उपस्थितीत उषा शर्मा यांनी बैठकीत दिले. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी व पुरातत्त्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.राज्य सरकारने वारंवार पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून या मंदिराचे काम चालू करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले तरीही या कामाला पुरातत्त्व खात्याकडून परवानगी मिळाली नव्हती. मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांच्या भावना उषा शर्मा यांना सांगितल्यावर त्यांनी संवर्धनाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.शासनाकडून जो निधी मंदिराचे संवर्धन करण्यासाठी आला आहे तो निधी तसाच पडून आहे. त्यामुळे मंदिराला सुस्थितीत ठेवण्यासाठी व दुरुस्तीसाठी शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्त्व खात्याकडे यापूर्वी झालेल्या बैठकीत केली होती.नवी दिल्ली येथे मंगळवारी पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत महानिदेशक उमा शर्मा यांच्यासोबत खासदार संभाजीराजे यांनी शिवराजेश्वर मंदिराच्या संवर्धनाच्या कामांबाबत चर्चा केली. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
पन्हाळागडावर लाईट अॅन्ड साऊंड शोे पुरातत्त्वची तत्त्वत: मान्यता : संभाजीराजे यांचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:29 AM