पन्हाळा : पन्हाळगडावर रविवारी (दि.२४) दारु पार्टी झाल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवभक्तामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर गडाचे पावित्र भंग होत असल्याने विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गड, किल्यावर दारु बंदी व्हावी ही शासनाची नियमावली आहे, पण गडावर राजरोस दारु दुकाने चालू आहेत. ही दुकाने बंद करावीत अशी मागणी विविध संघटनांनी तहसीलदार यांचेकडे निवेदन देवून केली होती. त्या संदर्भात येत्या सोमवारी (दि.१ ऑगस्ट) बैठकीचे आयोजन केल्याचे पत्र संघटन प्रमुखांना तहसीलदार यांनी पाठवले आहे.पन्हाळगडाची पडझड होत असताना पुरातत्त्व खाते याकडे लक्ष देत नसल्याचा ठपका जोर धरत असताना, काही हुल्लडबाज दारु पिऊन तटबंदीचे दगड काढुन दरीत ढकलुन आपला विकृत आनंद व्यक्त करतात. गडावर दारु उपलब्ध होते, ती बंद व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवराष्ट्र धर्म संघटनानी मागणी केली आहे.बैठक हे निव्वळ नाटकदारु दुकानाला परवाना देताना पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेकडील ना हरकत शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागते ते कुणी दिले याची चौकशी केली तर ही दुकाने बंद होतील. पण राजकिय दबावामुळे हे घडत नाही. त्यामुळे तहसीलदार यांचे समोर सोमवारी होणारी बैठक हे निव्वळ नाटक असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल मोरे यांनी व्यक्त केले.
पन्हाळगडावरील दारु दुकानं बंद होणार? तहसिलदारांनी बोलावली सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:29 AM