कोल्हापूर : मतदानाचा हक्क हा मूलभूत कर्तव्य असल्याच्या भावनेतून सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी सम्राटनगरातील पूजा नंदकुमार आयरे यांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. लहान मुलांसमवेत मतदारसंघात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे राहिले होते.कोल्हापुरात विधानसभेसाठी सोमवारी चुरशीने मतदान झाले. नवमतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला. काहींनी चालता येत नसतानाही दुसऱ्याचा आधार घेत मतदान केंद्रावर आले, तर काहींनी अडचणींवर मात करत मतदानाचा पवित्र हक्क बजावल्याचेही समोर आले. यापैकी एक म्हणजे सम्राटनगरातील पूजा आयरे या आहेत. त्यांना तीन महिन्यांपूर्वीच एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळी मुले झाली आहेत. त्यांचे पती यवतमाळ येथे सहायक पोलीस निरीक्षक आहेत.
घरामध्ये दोन लहान मुले असल्यामुळे त्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी सोबत कोणीतरी असल्याशिवाय जाता येत नाही. सोमवारी मतदानादिवशी त्यांनी यावर मात करत दोन्ही मुलांना घेऊन थेट सम्राटनगरातील जीवेश्वर हॉल गाठले. त्यांनी मुलांसोबतच मतदानाचा हक्क बजावला.
कोणतीही निवडणूक असो, चाळीस, पन्नास टक्के मतदान होणे ही निवडणुकीची यशस्वीता म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ ५0 टक्के मतदान झाले आणि २0 टक्के मतदान होणारा उमेदवार विजयी झाला; मात्र २0 टक्के मते घेणारा तो उमेदवार मतदारसंघातील १00 टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करेल, हे योग्य होणार नाही; त्यामुळे कारण न सांगता सर्वांनी मतदान केले पाहिजे, या विचाराने आपण मतदानाचा पवित्र हक्क बजावला.- पूजा आयरे