राजाराम लोेंढे
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या खातेदारांच्या संख्येत सांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जून महिन्यात राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण आॅनलाईन अर्ज दाखल करण्यापासून कर्जमाफी योजना वादाच्या भोवऱ्यात आडकली आहे. कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सरकारने अनेक तारखा सांगितल्या, पण अद्याप सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेलाच नाही.
आतापर्यंत दोन ग्रीन याद्यांच्या माध्यमातून खातेदारांची नावे व त्यांच्या रकमा बँकांकडे जमा झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील दोन्ही यादीत २१ हजार १२४ खातेदारांच्या नावावर ७८ कोटी ७१ लाख रुपये आले; पण त्यातील १७ हजार ८५४ खात्यांवर ७० कोटी ९४ लाखाचा जमा-खर्च आतापर्यंत पूर्ण झाला आहे.
सातारामध्येही १८ हजार ५०२ खात्यांचे ८६ कोटी ५६ लाख ५१ हजार रुपये रक्कम आली. त्यापैकी १५ हजार २६४ खात्यांचे ७२ कोटी २८ लाखाचा जमाखर्च खाला आहे. कोल्हापूर मध्ये मात्र परिस्थिती वेगळी असून राज्यात सर्वांत संथगतीने काम येथे सुरू असल्याने केवळ १७०० खातेदारांचे ७ कोटी १ लाख रुपये दोन्ही यादीतून आले आहे. त्यापैकी १५७७ खात्यांचा साडेसहा कोटींचा जमा-खर्च पूर्ण झाला आहे.
विभागातील ३६०२ विकास संस्थांच्या माध्यमातून ६ लाख ६२ हजार २७१ खातेदारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३४ हजार ६९५ खातेदारांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. एकूण अर्जांच्या केवळ ५ टक्के खातेदारांना आतापर्यंत लाभ मिळाल्याने उर्वरित खातेदारांना लाभ कधी मिळणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे.
अपात्र कर्जमाफीचा धसका!केंद्र सरकारने सन २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीमध्ये सर्वाधिक ४४ हजार शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांचे माफ केलेले ११२ कोटी ‘नाबार्ड’ने वसूल केले. त्याचा धसका सहकार विभागाने घेतल्याने कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून चाळण लावल्यानेच कर्जमाफीत कोल्हापूर मागे राहिला आहे.
अशी आहे कर्जमाफीची परिस्थिती :जिल्हा कर्जमाफीचे एकूण प्रस्ताव आतापर्यंत मंजूर जमा खर्च झालेली रक्कमसांगली १ लाख ७० हजार ७६६ १७ हजार ८५४ ७० कोटी ९४ लाख ९५ हजारसातारा २ लाख ४० हजार ७४७ १५ हजार २६४ ७२ कोटी २८ लाख ७८ हजारकोल्हापूर २ लाख ५० हजार ७५८ १ हजार ५७७ ६ कोटी ५० लाख १४ हजार