दत्तात्रय पाटीलम्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग पिके उद्ध्वस्त झालीच; पण महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाढविलेले ऊस पीक अक्षरश: जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे. सहा महिने राबून हातातोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने जगायचं कसं? या विवंचनेत शेतकरी आहेत.परतीच्या पावसाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. साधारणत: तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमुगांसह कडधान्य घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिल्याने भात, सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
भात आणि सोयाबीन पाण्यात गेल्याने खराब होऊन अस्वे (कोंब) फुटले आहेत. सोयाबीनच्या शेंगा कुजल्या तर ज्या पाण्याच्या वर राहिल्या त्याचे दाणे काळे पडले आहेत. जमिनीची प्रत चांगली असल्याने भात गुंठ्याला क्विंटल उत्पादन मिळत होते. यंदा मात्र त्यात मोठी घट झाली आहे. भात, सोयाबीनचे बियाणे खरेदी, मशागत आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.रब्बीचे वेळापत्रक कोलमडलेपरतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे राहिले आहे. त्यातून भातासह इतर पिके काढली तरी रब्बीची पेरणी करणे अवघड बनले आहे. आता पाऊस थांबला तर जमिनीला वापसा येण्यासाठी किमान १५ ते २0 दिवस लागणार आहेत. त्यानंतरच रब्बीच्या पेरण्या होऊ शकतात. जरी रब्बीचा हंगाम नोव्हेंबरअखेर असला तरी उसाच्या नवीन लागणी मात्र खोळंबल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्यावर्षी २० गुंठ्यात भाताचे १९ क्विंटलचे उत्पादन मिळाले; पण यंदा सहा क्विंटलही पदरात पडले नाही. यातून आतापर्यंत केलेला खर्चही निघालेला नाही, मग सांगा आम्ही जगायचं कसं?- तेजस पाटील,शेतकरी, मळगे
महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून कशीबशी वाढविलेली पिके परतीच्या पावसाने घालवली. सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या, पाण्याने कुजल्या तर राहिलेल्या शेंगांचे दाणे काळे पडल्याने त्याला कोणी घेण्यास तयार नाही.- अमर पाटील, शेतकरी, बानगे