जिल्हा परिषदेचे साडे बत्तीस कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:21 PM2021-07-29T13:21:54+5:302021-07-29T13:25:17+5:30
Flood Kolhapur Zp : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यातील प्रचंड पावसामुळे जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील घालवाड आणि नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. अरळगुंडी ता. गडहिंग्लज, असळज ता. गगनबावडा, उपकेंद्र पिपळे, केखले ता. पन्हाळा आणि आवळी बु. ता. राधानगरी या आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे.
महापुराचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना बसला आहे. इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग अशा ७० रस्त्यांचे नुकसान झाले असून याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रूपयांची गरज भासणार आहे. तर जि.प. कडील आणखी ३६ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी ८ कोटी ६० लाख रूपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यातील १०४ शाळा आणि प्रशासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी ७१ शाळांना आणि पाच प्रशासकीय इमारतींना महापुराचा फटका बसला आहे.
चौकट
सात ठिकाणी कोसळली दरड
राधानगरी तालुक्यातील पनोरी फेजिवडे, बाजरीचा धनगरवाडा, दुर्गमनवाड ते मिसाळवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यात बुधवारपेठ ते सुपात्रे रस्ता, म्हाळुंगे मसाई देवालय रस्ता, बोरपाडळे ते भाडळे रस्ता खचला आहे. गगनबावडा तालुक्यातील म्हासुर्ली, बावेलीपासून पुढे मिळणाऱ्या रस्त्यावर तर शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण पाल सावर्डी ते इजोली आणि शाहूवाडी ते येळवडी रस्त्यावर दरड कोसळली आहे.
अ.न. विभाग तपशील संख्या अंदाजे नुकसान
१ ग्रामीण पाणी पुरवठा पा.पु.योजना ४८७ ९ कोटी ८० लाख
२ बांधकाम रस्ते ७० १० कोटी, इमारती १०४ १ कोटी ६७ लाख
३ मुख्य./प्रधानमंत्री सडक रस्ते ३६ ८ कोटी ६० लाख
४ शिक्षण शाळा ९८ १ कोटी ९६ लाख
५ अंगणवाडी इमारती १२ ९ लाख
६ आरोग्य प्रा.आरोग्य केंद्रे,/उपकेंद्रे ५ १० लाख ६५ हजार
७ पशूसंवर्धन पशूधन ६३ १५ लाख १३ हजार
एकूण ३२ कोटी ३७ लाख
संपर्क तुटलेली गावे ४११
- स्थलांतरित कुटुंब संख्या ३४ हजार २८६
- स्थलांतरित लोकसंख्या १ लाख ५० हजार ६५७
- नातेवाईकांकडे स्थलांतरित १ लाख २६ हजार ४५५
- शासकीय निवारागृहे २९९
- निवारागृहात स्थलांतरित १ लाख ६३ हजार ३९९
- कोविड बाधित पूरग्रस्त निवारागृहे १९
- दाखल कोविडबाधित पूरग्रस्त १२१
- स्थलांतरित जनावरे ६१ हजार ७२०
- बंद पडलेल्या पाणी योजना ४८७
शेतकऱ्यांच्या दक्षतेने वाचले पशूधन
महापुराचा अंदाज आल्यानंतर यंदा शेतकरी शांत बसले नाहीत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी पशूधन नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पशूधनाला महापुराचा फटका बसला नाही. जिल्ह्यातील ६० हजार ७९५ जनावरांना पशूपालकांनी महापुराआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर शिरोळ तालुक्यातील तीन आणि करवीर तालुक्यातील दोन अशा पाच छावण्यांमध्ये ९२५ पशूधन स्थलांतरित करण्यात आले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी महापुराच्या बैठकांमध्ये चर्चा केली आहे. कोरोनामुळे एकीकडे जिल्हा परिषदेवरील कामाचा ताण वाढला आहे. अशातच महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडून तातडीने निधी मिळवून देण्याची विनंती केली आहे. प्राधान्याने करावी लागणाऱ्या कामांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
राहूल पाटील,
अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर
नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही काही गावातील पूर्ण पाणी ओसरले नाही. काही ठिकाणी जाता आलेले नाही. त्यामुळे आणखी काही दिवसांत नेमके किती नुकसान झाले हे निश्चित होईल. प्रशासकीय सुचनांप्रमाणे याचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार निधीची मागणी केली जाईल.
-संजयसिंह चव्हाण
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर