राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हापूस आंब्याच्या पेटीचा दर ५०० रुपयांनी घसरला आहे. आमरसासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पायरी’ही दर ८० ते १०५ रुपये डझन झाला आहे. अक्षयतृतीयेच्या अगोदर यावर्षी पहिल्यांदाच आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
कोरोनामुळे हापूस आंब्याच्या सलग दुसऱ्या हंगामावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ऐन हंगामात कडक लॉकडाऊन झाले. यावर्षी हंगाम सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने निर्बंध घातले. सकाळी सात ते अकरा या वेळेत खरेदी विक्री करावी लागते. त्याचा परिणामही आंब्याच्या उलाढालीवर झाला आहे. अक्षयतृतीयेच्या तोंडावर हापूसची मागणी वाढते, आणि दर उसळी खातो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. यंदा मात्र आवक वाढली. मात्र खरेदीदार नसल्याने दरात मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे ५०० तर बॉक्स मागे २०० रुपयांची घसरण झाली आहे.
हापूस आंब्याचा दर प्रति बॉक्स
हापूस (रत्नागिरी) - २०० ते ४०० रुपये
हापूस (कर्नाटक) - १०० ते २५० रुपये
इतर आंब्याचे दर असे प्रति बॉक्स (१२ नग)
आंबा किरकोळ घाऊक
केशर - २२५ १७५ रुपये
पायरी - २५० २०० रुपये
गावरान - १३० ७५ रुपये
आवक वाढली, ग्राहक रोडावले
कोल्हापूरात कर्नाटक, रत्नागिरी, देवगड येथून आंबा मोठ्या प्रमाणात येत आहे. हंगाम अंतिम टप्यात असल्याने आवक वाढली असली तरी कोरोनाच्या निर्बंधांमुळे ग्राहक रोडावले आहेत.
तुलनात्मक आवक व दर
तारीख हापूस आवक दर
३ मे ११ हजार ६५१ बॉक्स २०० ते ६०० रुपये
११ मे १५ हजार ७९० बॉक्स १५० ते ४०० रुपये
कोट -
साधारणत: मे महिन्यात आंबा खरेदीसाठी बाजारात जत्रा भरत होती. मात्र, यंदा निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आवक चांगली असली तरी दर घसरले आहेत.
- सलीम बागवान (आंबा व्यापारी, बाजार समिती)
गेली दोन वर्षे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरली आहेत. अगोदरच कर्नाटक आवकेचा परिणाम झाला असताना कोरोना निर्बंधामुळे चार तासात मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे पेटीमागे ७०० रुपयांचा फटका बसत आहे.
- स्वप्नील नाकरेकर (शेतकरी, पाटीलवाडी, रत्नागिरी)