Kolhapur: दाजीपूर अभयारण्यात आढळला 'ल्युना मॉथ' पतंग, सात ते दहा दिवसच आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 03:29 PM2024-12-06T15:29:41+5:302024-12-06T15:30:27+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : निसर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्यात २०२२ मध्ये 'सदर्न बर्डविंग' हे फुलपाखरू आढळले होते. आता 'ल्युना ...
गौरव सांगावकर
राधानगरी : निसर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्यात २०२२ मध्ये 'सदर्न बर्डविंग' हे फुलपाखरू आढळले होते. आता 'ल्युना मॉथ' अतिशय सुंदर असलेले निशाचर प्रजातीचे पतंग आढळले आहे. याला 'एक्टियास ल्यूना' असेही म्हणतात.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जास्त प्रमाणात फुलपाखरू, कीटक, अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळतात. पण ल्यूना पतंग क्वचितच दिसतात. कारण त्यांचे आयुष्य फक्त ७ ते १० दिवसांचे असते आणि ते रात्री उडतात. या पतंगाला लांब वक्र शेपूट असतात. पंख फिकट हिरवे असतात.
त्यांच्या शरीराच्या पुढच्या बाजूस असणारे सुरवंट पानाप्रमाणे दिसतात. पतंगावर चार डोळ्यांचे ठिपके भक्षकांना गोंधळात टाकतात. पतंगाच्या लांब शेपट्यादेखील वटवाघूळ शिकार करण्यासाठी वापरत असलेल्या प्रतिध्वनीमध्ये व्यत्यय आणू शकतात. इतर अनेक रेशीम पतंगांप्रमाणे, हा पतंग आहार देत नाहीत म्हणून त्यांच्याकडे पचनसंस्था नसते. त्यांचा जीवनातील एकमेव उद्देश पुनरुत्पादन हा आहे.
पतंगामध्ये रेशमी पतंग, आंधळा पतंग, देवदूत पतंग, केसाळ पतंग, असे प्रकार पहावयास मिळतात. हा भारतापासून जपानपर्यंत आणि दक्षिणेकडे नेपाळ, श्रीलंका, पूर्व आशियातील इतर बेटांमध्ये आढळतो तर हा पतंग क्वचित पहावयास मिळतो. दाजीपूर अभयारण्यात हा पतंग आढळल्याने निसर्गप्रेमीतून समाधान व्यक्त केले जात आहे.