स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींच्या विचाराने माधवराव बागलांची स्वातंत्र्य लढ्यात उडी
By संदीप आडनाईक | Published: August 18, 2022 01:57 PM2022-08-18T13:57:44+5:302022-08-18T13:58:16+5:30
चित्रकार आहात, तर चित्रे अशी काढा की त्यामुळे जनसेवा घडेल. या वाक्यांनी माधवरावांच्या जीवनात क्रांती घडली.
माधवराव बागल यांची प्रत्यक्ष लढ्याला सुरुवात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन झाली. वडिलांच्या हंटर या दैनिकाची प्रूफे तपासणे, वर्तमानपत्र काढणं, दुसऱ्या मासिकांतील विचार मराठीत करून देणे अशी किरकोळ कामे त्यांनी सुरू केली होती. मोकळ्या वेळी लँडस्केपसाठी निसर्गात फिरत होते; पण वर्तमानपत्रांमुळे त्यांना जनसेवेची ओढ लागली.
चित्रकलेपासून परावृत्त व्हायला महात्मा गांधी यांचे एक वाक्य कारणीभूत ठरले. महात्मा गांधींनी कोल्हापूरला भेट दिली. त्यासाठी त्यांच्या वडिलांनी बराच पुढाकार घेतला होता. गावात फिरून फंड जमा केला होता. सत्यशाेधक समाजामार्फत त्यांनीच मानपत्र दिले. त्यावेळी महात्माजींच्या मोटारीत शेजारी बसण्याचा मान माधवरावांना मिळाला. त्यांनी सहजच विचारपूस केली व चित्रकार म्हणून त्यांनी त्यांची ओळख करून दिली होती. तेव्हा ते म्हणाले, चित्रकार आहात, तर चित्रे अशी काढा की त्यामुळे जनसेवा घडेल. या वाक्यांनी माधवरावांच्या जीवनात क्रांती घडली. त्यांनी भाषण स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यातून त्यांना हद्दपारीची शिक्षा भोगावी लागली.
भाई माधवराव बागल : (२८ मे १८९५ – ६ मार्च १९८६). महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि चित्रकार. कोल्हापूर येथे खंडेराव व कमलाबाई या दाम्पत्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील तत्कालीन कोल्हापूर संस्थानात नोकरीस होते, नंतर नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. ते सत्यशोधकी विचारांचे होते. त्यांचा प्रभाव माधवरावांवर होता. माधवराव यांनाही काही काळ कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला होता. माधवराव हे शेतकरी कामगार पक्षाचे एक नेते असल्याने त्यांना ‘भाई’ या उपाधीने लोक ओळखत असत. माधवरावांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. चित्रकार असले तरी त्यांनी स्वतःस राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत झोकून दिले.
प्रजापरिषदेची चळवळ
१९३२ पासून अस्पृश्योद्धार कार्यासाठी मंदिर प्रवेश, सहभोजने, हरिजन परिषदांचे आयोजन यांत ते अग्रेसर होते. भारतात विविध भागांत स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी घडल्या, तशाच प्रकारच्या चळवळी अनेक संस्थांनी प्रदेशांत घडल्या. त्यामध्ये बागल यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोल्हापूर संस्थानात छत्रपतींच्या अधिपत्याखाली जबाबदार शासन पद्धतीची मागणी करणारी प्रजापरिषदेची चळवळ बागल यांच्या नेतृत्वाखाली १९३९ मध्ये सुरू झाली. त्यात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
पुढे १९४९ मध्ये कोल्हापूर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. १९४२ पासून बागल हे कामगार लढ्यात उतरले. शाहू मिल मजूर संघटना, चित्रपट कामगार संघटना, कोल्हापूर संस्थान कामगार संघ अशा अनेक कामगार चळवळींत कार्य केल्यावर ते १९५३ पासून शेतकरी कामगार पक्षात काम करू लागले. पन्हाळा येथील १९४८ च्या प्रजा परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी मराठी भाषिक प्रदेश एकीकरणासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख केला होता. या चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कोल्हापूर जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते. १९५१ पासून ते महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत त्यांनी अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केलेच, तसेच आपल्या वाणी आणि लेखणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रसार केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीत अग्रभागी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीत माधवराव बागल अग्रभागी होते. १९५८ मध्ये बेळगावमध्ये झालेल्या सीमा सत्याग्रहात त्यांनी पहिले सत्याग्रही म्हणून नेतृत्व केले. त्यांना अटक होऊन त्यांची मंगळूर येथील तुरुंगात रवानगी झाली. १९६१ नंतर मात्र बागल यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणास अनुकूल भूमिका घेतली. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्याशी त्यांचा स्नेह होता. महाराष्ट्र सरकारच्या पंचवार्षिक योजना सल्लागार समिती, आर्ट एज्युकेशन समिती अशा समित्यांवर त्यांनी काम केले.
राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे आणि स्मारके यांची उभारणी
कोल्हापुरात महात्मा गांधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे आणि स्मारके यांची उभारणी बागल यांच्या प्रयत्नांतून झालेली आहे. कोल्हापुरात लोकवर्गणीतून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांचा पुतळा तयार करून १९५० मध्ये उपस्थित जनसमुहातील सामान्य नागरिकाकडून त्याचे अनावरण केले होते. बिंदू चौकातील हुतात्मा स्तंभ उभारण्यात बागल यांचाच पुढाकार होता. बागल यांनी आत्मचरित्रपर लेखन माझा जीवन प्रवास या नावाने पहिले तीन भाग, चौथा भाग सत्याग्रहातून सहकार्याकडे व पाचवा संघर्ष आणि सन्मान अशा पाच भागांत केले आहे.
आठवणींच्या स्वरूपात बंधनात, जीवन संग्राम, सिंहावलोकन व माझ्या जीवनाच्या प्रेरणा हे ग्रंथ लिहिले. बागल यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी ‘डी.लिट’ या सन्माननीय पदवीने त्यांचा गौरव केला. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टने त्यांना प्रतिष्ठेच्या शाहू पुरस्काराने गौरवले. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र’ पदवी दिली, तर भारताच्या पंतप्रधानांकडून ‘ताम्रपट’ प्रदान करून व राष्ट्रपतींकडून ‘पद्मभूषण’ या पदवीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
–संदीप आडनाईक