आजरा : आजरा तालुक्यात सलग आठ दिवस कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शनिवारी तालुक्यात ६१ जण पाॅझिटिव्ह, तर मुमेवाडी येथील ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मडिलगे गावात आज ३२ जण पॉझिटिव्ह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.
शनिवारी कोरोनाचे १२२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी ६१ जण पॉझिटिव्ह, तर ६१ जण निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी मडिलगे ३२, उत्तूर १३, चव्हाणवाडी ५, महागोंड ५, किणे ३, महागोंडवाडी, कानोली, मेंढोली प्रत्येकी १ असे एकूण ६१ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक झाली आहे. मडिलगे येथे शनिवारी कोरोनाची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाकडून रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विकास अहिर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ हे उपस्थित होते. त्यामध्ये ३८ पैकी ३२ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. ३२ पैकी १२ जणांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना तातडीने कोविड सेंटरला हलविले आहे; तर २० जणांना होम क्वारंटाईन केले. एका दिवसात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.