कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या हिताचा डांगोरा पिटणाऱ्या महादेवराव महाडिक यांचे ‘गोकुळ’मध्ये ४० टँकर आहेत. त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांच्या मिळकतीसाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा गंभीर आरोप राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे नेते, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कोल्हापूर आईस अॅन्ड कोल्ड स्टोरेज कोणाच्या पत्नीच्या मालकीचे आहे, हे जगजाहीर असून दूध उत्पादकांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्यांचे पितळ उघडे पडले असल्याचे सांगत सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर, इचलकरंजीसह शेजारी परिसरात दुधाची मागणी जास्त असताना मुंबईलाच पाठविण्याचा अट्टाहास का? टँकर भाडे व वितरण कमिशनच्या लोण्यापोटी उत्पादकांचे लाखो रुपये उडविण्याचे काम सुरू आहे. संचालकांचा वाहनखर्च चार कोटी आहे, दरवाढ झाल्यानंतर पंधरा दिवसांनी अंमलबजावणी करायची, अशा अनेक गोष्टींबाबत ‘एनडीडीबी’ ने वारंवार सूचना केल्या आहेत, पण लेखापरीक्षणासह सर्व सूचना केराच्या टोपलीत टाकून गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम या मंडळींनी केले. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केल्याने संघाची भरभराटी झाली. ब्रँड तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे पण नंतरच्या काळात जे ‘कारभारी’ म्हणून आले त्यांच्याकडून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठीच संघाचा वापर केला. ‘अमूल’चा विकास पाच वर्षांत दुप्पट झाला पण ‘गोकुळ’चा का नाही. सत्ताधाऱ्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी आम्ही पॅनेल केले. स्वत:हून लोक येऊन पाठिंबा देत आहेत, हे पाहता यश निश्चित मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्था संगणकीकृत पण संघ‘गोकुळ’ दूध संघाच्या संलग्न प्राथमिक दूध संस्था संगणकीकृत झाल्या, पण दूध संघ अद्याप पूर्णपणे संगणकीकृत केला नाही. यामागेही मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. नितळ दुधाची कमाई कोणाच्या खिशात संस्थांकडून आलेल्या कॅनमधील दूध ओतून घेतल्यानंतर दररोज ६ हजार लिटर दूध शिल्लक (नितळ) राहते. हे दूध कुठे जाते, याचा हिशेब कोणाच्या खिशात जातो, याचे उत्तर सत्ताधारी मंडळी देणार का? असा सवाल पाटील यांनी केला. दादांचे स्वागतसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लेखापरीक्षण अहवालानुसार चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
‘गोकुळ’मध्ये महाडिकांचे ४० टॅॅकर
By admin | Published: April 22, 2015 12:45 AM