कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारपासून डिझेलऐवजी इलेक्ट्रिकवर धावण्यास सुरूवात झाली. हरिप्रिया एक्स्प्रेसदेखील मिरजपर्यंतच इलेक्ट्रिकवरून धावणार असल्याचे सांगण्यात आले. अशा पद्धतीने कोल्हापूररेल्वेच्या इतिहासात आणखी एका नव्या टप्प्याला नव वर्षाच्या सुरुवातीपासून प्रारंभ झाला.गेली काही वर्षे कोल्हापूर - मुंबई मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होऊन त्याची चाचणीही याआधी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर सोमवार, दि. २ जानेवारीपासून दोन रेल्वे इलेक्ट्रिकवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी हरिप्रिया एक्स्प्रेस मिरजेपर्यंत इलेक्ट्रिकवर धावली. नंतर मात्र ती पुन्हा डिझेल इंजिनव्दारे प्रवास करणार आहे.पाच लाखांच्या डिझेलची बचतकोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसला तब्बल अडीच लाख रुपयांचे डिझेल लागत होते. त्यामुळे येता-जाता या एक्स्प्रेसच्या डिझेलचा खर्च पाच लाख रुपये येत होता. मात्र, आता ही रेल्वे पूर्णपणे विद्युतीकरणाच्या माध्यमातून धावणार असल्यामुळे रोजची रेल्वेची पाच लाखांच्या डिझेलची बचत झाली आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस आता डिझेलऐवजी इलेक्ट्रिकवर, कोल्हापूर रेल्वेच्या इतिहासात आणखी एका नव्या टप्प्याला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 2:18 PM