कोल्हापूर जिल्ह्यात महापूर; शिवाजी पूल बंद-जनजीवन विस्कळीत : पंचगंगेने धोका पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:08 AM2018-07-18T01:08:59+5:302018-07-18T01:10:44+5:30
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने मंगळवारी रात्री अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी४३.१ फूट होती. मुसळधार पावसामुळे पंचगंगेला महापूर आला
कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने मंगळवारी रात्री अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी४३.१ फूट होती. मुसळधार पावसामुळे पंचगंगेला महापूर आला आहे. जिल्ह्यातील नदीक्षेत्रातही हीच परस्थिती आहे.
यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाऊस असाच सुरू राहिला तर पूरस्थिती अधिक गंभीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदारयांनी सकाळी शिवाजी पुलासह रेडेडोह, शिरोळ, हातकणंगलेमध्ये भेट देऊन पाहणी केली. सकाळी कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्टÑीय मार्ग शिवाजी पुलावरून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ८५ बंधारे पाण्याखालीअसून ६० मार्ग व १२ एस. टी.बसचे मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी धरण मंगळवारी सायंकाळी ९१.१६ टक्के भरले आहे. पाऊस असाच राहिला तर ते १०० टक्के भरून स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरस्थिती आणखीच गंभीर होण्याचा धोका आहे. धुवाधार पावसाने पंचगंगेसह अन्य नद्यांना महापूर आला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. यामुळे ८५ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली.
महापुराच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे व जिल्हाधिकारी सुभेदार यांनी शिवाजी पूल, केर्ली येथील रेडेडोह येथे जाऊन पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासोबत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाड, हातकणंंगले तालुक्यांतील नवे पारगाव, निलेवाडी येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक कोलमडली; तर राष्टÑीय महामार्ग एक, राज्यमार्ग १०, प्रमुख जिल्हामार्ग २३, ग्रामीणमार्ग ११, इतर जिल्हा मार्ग १५ व असे ६० मार्ग; तर एस. टी.चे १२ मार्ग अंशत: बंद राहिले. कोल्हापूर-रत्नागिरी राष्टÑीय महामार्गावरील शिवाजी पूल सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन या ठिकाणी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मंगळवारी सकाळी आठपर्यंत ७८.९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये १८३.०० मि.मी., त्याखालोखाल राधानगरीमध्ये १०८.१७ मि.मी. पाऊस पडला आहे.
बर्की, टेकवाडीची ‘एस.टी.’ बंद
धुवाधार पावसाने बर्की (ता. शाहूवाडी) व टेकवाडी (ता. गगनबावडा) या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील एस.टी. सेवाही बंद झाली आहे.
बालिंगा पूल बंद
कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावरील भोगावती नदीवरील बालिंगा पूल वाहतुकीसाठी रात्री बंद करण्यात आला. पुलाशेजारी पाणी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतला.
‘मच्छिंद्री’ झाली....
पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यावर धोका निर्माण होऊन मच्छिंद्री होते व कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील आंबेवाडीजवळ असणाºया रस्त्यावरून पाणी पलीकडे वाहू लागते. त्याला ‘रेडेडोह फुटला’ असे म्हटले जाते. मंगळवारी मध्यरात्री पाणीपातळी ४३ फुटांवर जाऊन पंचगंगेवरील शिवाजी पुलाची ‘मच्छिंद्री’ झाली.
राधानगरी धरण ९१.१६ टक्के भरले
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी धरण ९१.१६ टक्के भरले असून, येथून १६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कडवी धरण १०० टक्के भरले असून १६ हजार ३८८ क्युसेकविसर्ग सुरूआहे. वारणा ८५.१३ टक्के भरले असून, येथून १८ हजार ११२ क्युसेक, कुंभी ८१ टक्के भरले असून ३५० क्युसेक, कोयना ७७.९३ टी.एम.सी.भरले असून ७ हजार ८८८ क्युसेक, अलमट्टी १०७.७२ टी.एम.सी. भरले असून ४७ हजार ६५१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरण ७९.७२ टक्के भरले आहे.
पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी; महापालिकेचा ‘हायअलर्ट’ महापौर आज महापुराची पाहणी करणार
शहर तसेच जिल्ह्णात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीला महापूर आला आहे; त्यामुळे महापौर शोभा बोंद्रे या महानगरपालिका अधिकारी तसेच पदाधिकाºयांसमवेत आज, बुधवारी सकाळी शहरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला जाईल. तसेच स्थलांतरित नागरिकांना देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करणार आहे. दरम्यान, महापौर बोंद्रे यांनी महापुराच्या काळात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरांतर्गत असलेल्या ओढे, नाले व नदी या पूरक्षेत्रात ज्या नागरी वस्त्या आहेत, तेथील नागरिकांनी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभागाशी संपर्क साधून तात्पुरत्या पुनर्वसन ठिकाणी स्थलांतर व्हावे, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना पुराच्या पाण्यात पोहण्यापासून परावृत्त करावे, असे महापौरांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरात मुसळधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला; त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने, जयंती नाल्याच्या पाण्यालाही फुग आल्याने ते नागरी वस्तीत घुसले.
दसरा चौकानजीकच्या सुतारवाड्यातील तेरा कुटुंबांतील ५५ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यापैकी पहाटे पाच कुटुंबातील २८ जणांचे चित्रदुर्ग मठात, तर आठ कुटुंबातील २७ जणांचे मुस्लिम बोर्डिंगमध्ये सायंकाळी स्थलांतर केले. दरम्यान, उपनगरांत तीन ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सायंकाळनंतर अधूनमधून काही काळ पावसाचा जोर मंदावला. काही वेळा उघडीप मिळाल्याने नागरिक पूरपरिस्थिती पाहण्यासाठी बाहेर पडले.
मंगळवारीही दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा ओघ कायम राहिला. दुपारनंतर त्याचा जोर कमी झाला असला तरी संततधार कायम होती. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पाणी पंचगंगा नदीरस्त्यावर जामदार क्लबच्या पुढे व्ही. आर. पाटील कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचले. मंगळवारीही सखल भागांत पाणी साचल्याने त्याला चर काढून मार्ग करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा गतिमान झाली होती. राजारामपुरी जनता बझार परिसरात तुंबलेल्या पाण्याचा सोमवारी (दि. १६) रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या यंत्रणेने जेसीबी मशीन लावून चर काढून निचरा केला.
सुतारवाड्यातील तेरा कुटुंबांचे स्थलांतर
दसरा चौकानजीकच्या सुतारवाड्यात जयंती नाल्याचे पाणी घुसले. ते नऊ घरांत शिरल्याने अनेकांच्या प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. या ठिकाणच्या पाच कुटुंबांना पहाटे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतरित केले; तर सायंकाळी आणखी आठ कुटुंबे मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतरित केली. परिसराची राजारामपुरी विभागीय कार्यालयातील उपअभियंता आर. के. जाधव व कर्मचाºयांनी पाहणी केली.