कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात बंद करून काहीही फायदा होणार नाही. उलट दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे १० आक्टोंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसल्याची स्पष्ट भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने सुरेश पाटील यांनी या बंदची घोषणा कोल्हापुरात परिषद घेवून केली होती. याबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला वर्षभरासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
न्यायालयाचा निर्णय मान्य करून त्याच्या पुढच्या कार्यवाहीसाठी सज्ज राहण्याची गरज आहे. ही मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येवून जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न सुरूही आहेत.
अशावेळी कोरोनाची महामारी असताना महाराष्ट्र बंद करून काय फायदा होणार आहे असा माझा प्रश्न आहे. ज्यांनी कुणी बंद जाहीर केला आहे त्यांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी बंदची भूमिका घेवू नये.