कोल्हापूरः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी भाजपाच्या अमल महाडिक यांचा 42,709 मतांनी पराभव केला आहे. ऋतुराज पाटील यांना 140103 मतं पडली असून, प्रतिस्पर्धी अमल महाडिक यांना 97394 मतं जनतेनं दिली आहेत. पुतण्याच्या विजयानंतर सतेज पाटील यांनीही एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे.सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहा जागा निवडून आल्या, याचा मनस्वी आनंद आहे. परिवर्तनाची लाट कोल्हापुरात आली. काँग्रेस मुक्त करू, असं म्हणणाऱ्यांना भाजपमुक्त जिल्हा करून योग्य उत्तर दिलं आहे, याचा आनंद आहे. युतीकडून सर्वसामान्य लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी 10 पैकी 6 जागा निवडून देण्याचा जनाधार मिळालेला आहे. अनेक अदृश्य शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होत्या. सकृतदर्शनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचंही अभिनंदन करतो. अदृश्यपणे अनेक हात या ठिकाणी होते, त्यांचंही अभिनंदन करतो. 1 लाखांच्या वर मतं ऋतुराज यांना मिळाली आहेत. त्याठिकाणी 40 ते 42 हजार मताधिक्यानं त्यांचा विजय झाला आहे.सर्वच लोकांनी मदतीची भूमिका याठिकाणी घेतलेली आहे. कोल्हापुरातील राजकारण स्वच्छ व्हावं, या भावनेतून जिल्ह्यातील नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मला अजूनही 10 ते 20 वर्षं राजकारण करायचं आहे. महापुरात युतीचं सरकार सपशेल अपयशी झालेलं होतं. महापुरात सरकार गायब होतं, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. वीज दरवाढ हा इथे महत्त्वाचा मुद्दा होता, त्याकडे लक्ष न दिल्यानं जनतेत नाराजी होती. तसेच येत्या काळात भाजपाबरोबर शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हायचंय की नाही हे ठरवावं, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आता प्रचंड वाढलेली आहे. शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपाचा माइंड गेम सुरू आहे. शिवसेनेला 50 टक्के वाटा भाजपा देणार काय, अशा प्रश्नांची निश्चितच आता उत्तरं मिळतील.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आमच्या यशामागे अनेक अदृश्य हातांची मदत- सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:17 PM