Maharashtra Flood : मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत, बॉलिवूडला मोठी चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:16 PM2021-07-28T22:16:36+5:302021-07-28T22:16:51+5:30
Maharashtra Flood : कोकणातील चिपळूण आणि महाडला पुराने पूर्णत: झोडपले असून शेकडो जणांचे जीव गेले आहेत. हजारो जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. तर, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले.
कोल्हापर - महाराष्ट्रातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसला आहे. महापुराच्या दोन दिवसांनंतर पाणी ओसरताच, राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले. हॅलिकॉप्टरने उड्डाण केलं, गाड्यांची चाकंही पूरग्रस्त भागातील गावखेड्यांकडे वळाली. मुख्यमंत्री आले, राज्यपाल आले, विरोधी पक्षनेते आले, एवढेच काय तर केंद्रीयमंत्रीही आले. येणाऱ्या प्रत्येकाने आश्वासन दिले. पण, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी भोकरदनला भेट दिली अन् संवेदशील भावनेतून 10 कोटींची मदतही जाहीर केली.
कोकणातील चिपळूण आणि महाडला पुराने पूर्णत: झोडपले असून शेकडो जणांचे जीव गेले आहेत. हजारो जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. तर, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले. पूर ओसरल्यानंतर आता या भागात नेतेमंडळीचे दौरे होत आहेत. या भागातील पीडितांवर आश्वासनांचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारने तातडीची मदत म्हणून व्यापाऱ्यांना 10 हजार व सामान खरेदीसाठी 5 हजार अशी 15 हजारांची मदत जाहीर केली आहे. मात्र, अद्याप कुठलंही पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
अभिनेत्री आणि शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन या गावाला भेट दिली. येथील विदारक चित्र पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्याच, संवेदनशील भावनेतून त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. यावेळी, त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली. एकीकडे बॉलिवूड कलाकारांवर टीका होत असताना दिपाली यांनी जाहीर केलेली मदत ही बड्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना मोठी चपराकच म्हणावी लागेल.
“भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय”, अशा शब्दात दिपाली सय्यद यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
राजकारणापेक्षा समाजकारणात आयुष्य जगणार
इच्छा नसतानाही केवळ लोकांच्या प्रेमापोटी मी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर दोन तीन वेळा निवडणूक लढवली. यातून निवडणूक काय असते आणि ती कशी लढवतात हे अनुभवता आले. दरम्यान, अनेक क्षेत्रातील अनुभवानंतर सामाजिक कार्यात मला अधिक आनंद मिळतो. या माध्यमातून सामान्य, वंचित घटकातपर्यंत जाता येते, त्यांच्या वेदना समजून घेता येतात. त्यामुळे यापुढे राजकारण नाही तर केवळ समाजकारणात पुढील आयुष्य व्यतीत करणार आहे, असे दिपाली यांनी यापूर्वी लोकमतशी बोलताना म्हटले होते.