कागलकरांना महाराष्ट्र केसरीची 'आस'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:48+5:302021-02-24T04:25:48+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : कुस्ती कलेला राजाश्रय देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या ...
दत्ता पाटील
म्हाकवे : कुस्ती कलेला राजाश्रय देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या कागल तालुक्याला अद्याप ‘महाराष्ट्र केसरी’ गदेची प्रतीक्षाच आहे. यंदा होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी चारपैकी कागलमधून तब्बल दोन मल्लांची निवड झाली आहे. त्यामध्ये रेल्वेचा मल्ल कौतुक डाफळे (पिंपळगाव बुद्रुक)याची गादी विभागातून तर शुभम बोंगार्डे (बानगे)याची माती विभागातून निवड झाली आहे. त्यामुळे कागलकरांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या आहेत.
१९६१मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्या वहिल्या महाराष्ट्र केसरी गदेची कागलकरांना प्रतीक्षा आहे.यापूर्वी रामा माने(पिराचीवाडी)व रवींद्र पाटील(बानगे)यांनी या गदेला हात घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र,ते उपविजेते ठरले.
अरुण बोंगार्डे हा पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. सध्या तो इचलकरंजी येथील प्रकाशराव आवाडे अकॅडमी येथे अमृता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
तसेच, अत्यंत चपळ असणारा, पाचवेळा ‘महाराष्ट्र केसरी’साठी पात्र आणि दोनवेळा उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या कौतुक डाफळे याच्याकडून कागलसह कोल्हापूरवासीयांना प्रचंड अपेक्षा आहेत. तो पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
दरम्यान, कागलची महाराष्ट्र केसरीची असणारी उणीव भरून काढणाऱ्या मल्लाचा उचित सन्मान करण्याचा मानस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे तर वस्ताद शिवाजीराव जमनिक यांनी लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
.............
यंदा कागलच्या अपेक्षा उंचावल्या : रवी पाटील
कागल तालुका अद्याप ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेपासून वंचित आहे. त्यामुळे यावेळी कौतुक डाफळे व अरुण बोंगार्डे यांच्याकडून कागलकरांना अपेक्षा आहेत. त्यादृष्टीने या दोन मल्लांची तयारी सुरू असून यामध्ये ते निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.