कोल्हापूर : भूगाव (जिल्हा पुणे) येथे सुरु असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत खुल्या गटातून महेश वरूटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार (सर्व कोल्हापूर) यांच्याकडून कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.कोल्हापूरच्या कुस्तीला संस्थानकालापासून पंरपरा आहे. देशासह देशाबाहेरील मल्लांनी या मातीत येऊन कुस्ती केली. त्यातून मानसन्मान मिळवला आहे. यासह जे मल्ल या मातीत राजर्षी शाहू महाराजांची किर्ती ऐकून सरावासाठीआले ते या मातीतीलच होऊन गेले. यात हिंदकेसरी दिनानाथसिंह, हरिश्चंद्र बिराजदार आदी मंडळींची नावे घ्यावी लागतील.
इतकी मोठी परंपरा असूनही २००० सालापासून महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरच्या मल्लांना हुलकावणी देत आहे. २००० साली विनोद चौगले यांनी ही गदा कोल्हापूरात आणली. त्यापुर्वी महान भारत केसरी दादु चौगले (१९७१), स्वर्गीय युवराज पाटील (१९७२, ७४ ), लक्ष्मण वडार (१९७३), संभाजी पाटील -आसगांवकर (१९८३), विष्णू जोशीलकर ( १९८५), यांच्या दिमाखदार कामगिरीनंतर आजतागयत या मानाच्या गदेने हुलकावणी दिली आहे.
गेल्या सतरा वर्षात कोल्हापूरात सराव करणारे अनेक मल्लांनी विविध जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत ही गदा पटकाविली. पण कोल्हापूरला २००० सालापासून एकाही मल्लालाही गदा पटकाविता आली नाही. त्यामुळे यंदा कोल्हापूरचे कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार, महेश वरुटे यांच्याकडून कुस्ती शौकीनांना मोठ्या अपेक्षा आहेत.
यासह चंद्रहार पाटील (राम सारंग यांच्या शिष्य), माऊली जमदाडे (गंगावेश तालीमचा व विश्वास हारुगले यांचा पट्टा) यांच्याकडून कुस्ती शौकीनांना अपेक्षा आहेत. यात चंद्रहार सांगलीचे, तर माऊली सोलापूरचे प्रतिनिधीत्व या स्पर्धेत करीत आहे.
बुधवारी सकाळी या स्पर्धेत माती गटात ७४ किलो गटात किरण पाटीलने अकोलाच्या राजेश चव्हाणवर ; तर भगतसिंग खोतने मुंबई शहरच्या अमोल पाटीलवर मात करीत तिसरी फेरी गाठली. तर ७९ किलोगटात शशिकांत बोगाडेने मुंबई पुर्वच्या गौरव हगवणेचा पराभव केला.