मेकर ॲग्रो फसवणूकप्रकरणी तक्रारदार करणार साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:27+5:302021-03-18T04:24:27+5:30
कोल्हापूर : मेकर ॲग्रो इस्टेट प्रा. लि. च्या माध्यमातून ५६ कोटींच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. आठ ...
कोल्हापूर : मेकर ॲग्रो इस्टेट प्रा. लि. च्या माध्यमातून ५६ कोटींच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. आठ जणांवर गुन्हे दाखल होऊनही एकालाही अद्याप अटक केली नसल्याचा आरोप मेकर कृती समितीच्यावतीने केला आहे. हा तपास जलद गतीने करावा, या मागणीसाठी ५ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे पत्रक कृती समितीने प्रसिद्धीस दिले आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीपैकी एक संशयित परदेशातून भारतात आल्यानंतर त्याच्या कुटुंबांचे मुंबई, कोल्हापूर विमानतळावरील फोटो तक्रारदारांनी पोलीस तपास यंत्रणेकडे दिले; पण तीन महिन्यांपासून फक्त तपास करत आहोत, असे सांगून तपासात प्रगती दिसत नाही. या तपासाची गती वाढवून संशयिताना अटक करावी, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे तक्रारदारांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. या पत्रकावर मोहन तेली, शीतलनाथ शेतवाळ, भुवनेश्वरी तोडकर, बाळासो बिंदगे, संगीता अनुशे, शिवाजी गुडाळे यांच्यासह २० हून अधिक तक्रारदारांच्या स्वाक्षरी आहेत.