कोल्हापूर : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पुरुषाला लुटले, तिघा चोरट्यांचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:05 AM2018-07-21T11:05:59+5:302018-07-21T11:10:37+5:30
कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कोल्हापूर : कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अधिक माहिती अशी, संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) हे राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी जेवण करून ते शतपावलीसाठी कार्यालयातून बाहेर पडले. चालत राजारामपुरी आठवी गल्ली येथे गेले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अडविले.
दोघेजण खाली उतरले. त्यांतील एकाने खिशातून रिव्हॉल्व्हर बाहेर काढून त्यांचेवर रोखली. तर दूसऱ्याने त्यांना लाथाने मारुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेत पुन्हा तिघेही दुचाकीवरून पळून गेले. अचानक घडलेल्या प्रकाराने गुरव भांबावून गेले; त्यामुळे त्यांना दुचाकीचा नंबर पाहता आला नाही. त्यांनी कार्यालयात येऊन सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
राजारामपुरी परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा रस्त्यावर चोरटे बिनधास्तपणे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महिलांपाठोपाठ आता पुरुषांनाही लक्ष्य करू लागल्याने घबराट पसरली आहे. पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढत आहेत. चोरटे २० ते २५ वयोगटातील आहेत. ते सराईत असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोणीही उठतो रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो
कोणीही उठतो आणि रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो. कारवाई करणार कोण? त्यामुळे भीती कोणाच्या बापाची...,अशा अविर्भावात सराईत गुन्हेगार बेकायदेशीर पिस्तुल, रिव्हॉल्व्हर दिवसाढवळ्या जवळ बाळगून वावरत आहेत. या गुन्हेगारांकडे रिव्हॉल्व्हर आले कुठून? बेकायदेशीर हत्यारांची तस्करी आजही कोल्हापुरात होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
आंधळेपणाचे ढोंग करणाऱ्यां पोलिसांनी आता आपल्या वर्दीची लाज राखली पाहिजे. अशा गुन्हेगारांचा बिमोड केला पाहिजे. अन्यथा कोल्हापूरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्यास भविष्यातील मोठे अनर्थ टळतील.