रस्ता नामकरणाने मंडलिकांच्या आठवणी चिरंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:51 PM2018-03-11T23:51:43+5:302018-03-11T23:51:43+5:30

The Mandalis memorials by the name of the road are eternal | रस्ता नामकरणाने मंडलिकांच्या आठवणी चिरंतन

रस्ता नामकरणाने मंडलिकांच्या आठवणी चिरंतन

Next


कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक हे विचारांशी पक्के, निर्भीड, प्रश्नांसाठी कितीही किंमत मोजणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांची लोकांच्या प्रेमाशी नाळ जोडली गेली होती. त्यातून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न नुसते मांडले नाहीत, तर ते अग्रभागी राहून सोडवून घेतले. त्यांचे नाव मोठ्या रस्त्याला दिल्याने त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील, असे गौरवोद्गार माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोल्हापुरात सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक ते कळंबा फिल्टर हाऊस या रिंग रोडला ‘लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक मार्ग’ असे नामकरण रविवारी सायंकाळी सायबर चौक येथे समारंभपूर्वक करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, रस्त्याला सदाशिवराव मंडलिक यांचे नामकरण केल्याने शहरातील त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील. शहरातील त्यांच्या वास्तव्यामुळे ते कोल्हापुरातील नागरिकांशी जोडले गेले. त्यामुळे कोल्हापुरातून ते निवडणुकीत कधीही मागे पडले नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी ते एकनिष्ठ होते. जिल्ह्याच्या विकासासाठी ते प्रश्न विचारून थांबले नाहीत; तर त्यांनी ते अग्रभागी राहून सोडवून घेतले. ते आपल्या विचारांशी पक्के, निर्भीड होते. एक निवडणूक वगळता मी त्यांच्या सर्व निवडणुकांत सेनापती होतो, हे मी माझे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्रा. संजय मंडलिक म्हणाले, सदाशिवराव मंडलिक यांचे अशा मोठ्या रस्त्याला नाव देऊन कोल्हापूरशी ऋणानुबंध वाढविले आहेत. त्यांचा कोल्हापुरात स्वतंत्र गट नसला तरीही सर्वच पक्षांत त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे ते सतत विजयी होत.
अनिल पाटील यांनी स्वागत केले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, नगरसेवक भूपाल शेटे यांनीही विचार मांडले. वीरेंद्र मंडलिक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास उपमहापौर सुनील पाटील, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी महापौर आर. के. पोवार, शिक्षण सभापती वनिता देठे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, माजी महापौर अश्विनी रामाणे, बाबूराव हजारे, प्रताप कोंडेकर, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, अ‍ॅड. अशोकराव साळोखे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, विजयसिंह मोरे, युवराज पाटील, भैया माने, प्रवीण केसरकर, सुरेश ढोणुक्षे, आजी-माजी नगरसेवक, हमीदवाडा साखर कारखान्याचे सर्व संचालक, आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडलिक यांचे
कार्य प्रेरणादायी
आमदार सतेज पाटील म्हणाले,
माजी खासदार सदाशिवराव
मंडलिक हे लढवय्या नेते होते; त्यामुळेच त्यांची सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळली होती. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व हे सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी होते. अशा या कर्तृत्ववान नेत्याची ओळख चिरंतन राहावी, यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तकात
धडा घ्यावा
सदाशिवराव मंडलिक यांचा आदर्श आजच्या पिढीला दिशादर्शक असल्याने शासनाने प्राथमिक शिक्षण पाठ्यपुस्तकात त्यांचे चरित्र छापावे यासाठी प्रयत्न करावेत, असे अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी भाषणात सुचविले.

Web Title: The Mandalis memorials by the name of the road are eternal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.