अभय व्हनवाडेरुकडी/माणगांव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवले जात आहे. मात्र या अभियानाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत घरोघरी राष्ट्रध्वजाबरोबरच संविधान प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच राजू मगदूम यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात असा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असून कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे. याच गावात संपूर्ण देशभर अस्पृश्योद्धाराच्या नव्या पर्वाला सुरुवात करणारी पहिली अस्पृश्य परिषद भरली होती.राष्ट्रध्वजाबरोबरच संविधान प्रत देण्याच्या या निर्णयाबरोबर विधवा महिलांना समाजात स्थान मिळावे याकरीता विधवा महिलांस १४ ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक सरपंच करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये याबाबत चिठ्ठीव्दारे नाव ठरविण्यात आले. यात सरपंच म्हणून वंदना जाधव व उपसरपंचपदी प्राजक्ता पोवार यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर, १५ ऑगस्ट रोजी सरपंच म्हणून सपना पाटील यांची निवड करणेत येणार असल्याची माहिती राजू मगदूम त्यानी दिली.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम आयोजित केले असून दि .१३ ऑगस्ट रोजी गावातील माजी सैनिकांचा सन्मान तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ७५ जेष्ठ नागरीकांचा सन्मान होणार आहे. याच रोजी माजी सैनिकांच्या हस्ते ग्रामपंचायत शाळा, विद्यालय, आरोग्य केंद्रासह सरकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गावर दोन्ही बाजूस 600 मीटर पर्यंत ध्वज फडकावण्यात येणार असून सर्व भिंतीवरतीही तिरंगा रंगात लेजरशो करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 7:04 PM