माणगाव आरोग्य केंद्र लसीकरणात जिल्ह्यात भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:15+5:302021-05-10T04:24:15+5:30
अभय व्हनवाडे / रुकडी माणगाव माणगाव आरोग्य केंद्रास प्राप्त झालेल्या लसीचा योग्य वापर केल्याने एका कुपीमध्ये दहा लोकांना देण्यात ...
अभय व्हनवाडे / रुकडी माणगाव
माणगाव आरोग्य केंद्रास प्राप्त झालेल्या लसीचा योग्य वापर केल्याने एका कुपीमध्ये दहा लोकांना देण्यात येणारी लस ११ जणांना देऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीचा लाभ देण्यात आला. या पॅटर्नचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, या पॅटर्नचा वापर जिल्ह्यात करावा, अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. माणगाव गावची लोकसंख्या ८७८० इतकी असून यांपैकी ३४०८ उद्दिष्टापैकी २७०५ ग्रामस्थांचे लसीकरण माणगाव ग्रामपंचायत व येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विशेष प्रयत्नाने करण्यात आले आहे. याचे प्रमाण ७९.३५ टक्के आहे. यामुळे माणगाव हे लसीकरणामध्ये भारी ठरत आहे.
माणगाव उपकेंद्रास १५० व्हायल प्राप्त झाले होते. या एका कुपीमध्ये पाच मि.लि. लस असते. त्यामध्ये प्रत्येकाला ०.५ मि.लि.प्रमाणे १० लोकांना लस दिले जाते; पण लस देत असताना कुपीमध्ये शिल्लक राहिलेले लस आणखी एका नागरिकांस देऊन ११ जणांना लस देण्याची कामगिरी केली आहे. अशा एकाच दिवसात १५ कुपी प्राप्त होतात. यामध्ये १५० नागरिकांना लस देणे अपेक्षित असताना वाया जाणाऱ्या लसीची उपयोगिता वाढवून ती १६५ नागरिकांना पुरेशा प्रमाणात दिली आहे. यामुळे हा पॅटर्न जिल्ह्यात भारी ठरत आहे. जिल्ह्याला एकाच वेळी बत्तीस हजार लस प्राप्त होत असून यामध्ये एकाच वेळी ३२ हजार नागरिकांना लस मिळते; तोच माणगाव पॅटर्न वापरला तर आणखी ३२०० जणांना लस प्राप्त होईल. या लसीकरणासाठी आरोग्यसेविका वाय. डी. गावित, सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, रुग्णकल्याण समितीचे सदस्य शिरीष मधाळे, पोलीस पाटील करसिद्ध जोग यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
चौकट
माणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये १५ व्हायल उपलब्ध झाल्या होत्या. त्यामध्ये १५० जणांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात १६५ जणांचे लसीकरण झाले आहे. म्हणजेच एका व्हायलमध्ये ११ जणांचे लसीकरण झाले आहे. हा पॅटर्न वापरल्यास जास्तीत नागरिकांना लस मिळेल व शासनाचे लाखो रुपये वाचतील.
- सरपंच राजू मगदूम