कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा देसाई यांनी शुक्रवारी दुपारी कार्यभार स्वीकारला, तर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अरुण जाधव यांनी बुधवारीच कार्यभार स्वीकारला आहे. हे दोघेही अधिकारी कोल्हापूरचेच आहेत.रविकांत आडसुळ यांची पालघर जिल्हा परिषदेकडे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनीषा देसाई यांची बदली झाली आहे. देसाई या मूळच्या कोल्हापूरच्या असून, त्यांचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले आहे.
२००२ साली प्रोबेशनरी गटविकास अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर कागल येथे बालविकास प्रकल्प अधिकारी, उत्तर सोलापूर येथेही याच पदावर, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, मोहोळ गटविकास अधिकारी अशा विविध पदांवर काम करून त्या २०१८ साली रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत विभागाकडे रुजू झाल्या. त्यानंतर आता त्यांची बदली सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. शुक्रवारी सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.राजेंद्र भालेराव यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे बदली झाल्याने त्यांच्या जागी हातकणंगले गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरुण जाधव यांची बदली झाली. जाधव हे कागल तालुक्यातील मौजे सांगावचे असून २००४ साली त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे प्रोबेशनरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर भोर, वेल्हा जि. पुणे, तासगाव जि. सांगली येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले.
त्यानंतर हातकणंगले गटविकास अधिकारी म्हणून ते कार्यरत असताना त्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे बदली झाली. त्यांनी बुधवारीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. डी. एम. हायस्कूल कसब सांगाव, न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले आहे.