आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २0 : बारावीची सुरू असलेली परीक्षा आणि तांत्रिक मुद्दे योग्य स्वरूपात स्पष्ट झाले नसल्याने ‘एमबीबीएस’च्या प्रवेश परीक्षेच्या अर्जातील ‘थंब इंम्प्रेशन’ अनेक विद्यार्थ्यांना करता आलेले नाही. या स्वरुपातील तांत्रिक अडचणीमुळे आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसतर्फे (एम्स्) २८ मे रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकणार आहेत. या परीक्षेतील गुणांवर प्रवेश ठरणार आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी प्रसिद्धीनंतर प्रवेश निश्चितीवेळी ‘थंब इंम्प्रेशन’ घ्यावे, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे. ‘एम्स्’तर्फे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी देशभरातील विविध केंद्रांवर २८ मे रोजी आॅनलाईन स्वरूपात प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ जानेवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान झाली. आॅनलाईन अर्ज करताना यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या हाताचे ‘थंब इंम्प्रेशन’ हे अपलोड करणे बंधनकारक होते. या अर्जात काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, बारावीची परीक्षा सुरू असल्याने त्यात विद्यार्थ्यांना ‘थंब इंम्प्रेशन’ची पूर्तता करता आली नाही. अभ्यासाच्या तणावात काही जणांकडून त्यात चूक झाली शिवाय त्यांना ‘एम्स’ने दिलेल्या मुदतीमध्ये चुकांची दुरुस्ती करता आली नाही. त्यावर काही विद्यार्थ्यांनी नव्याने थंब इंम्प्रेशन करून ते ई-मेलद्वारे ‘एम्स्’च्या प्रवेश परीक्षा विभागाच्या पाठविले आहे. त्यांचे अर्ज पात्र ठरले की, नाही हे २७ मार्चला समजणार आहे. अर्ज अपात्र ठरल्यास अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेला मुकावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
याचा विचार व्हावावैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी केंद्र सरकारतर्फे आॅल इंडिया प्री-मेडिकल टेस्टसाठी (एआयपीएमटी) ‘थंब इंम्प्रेशन’ची अट लागू केली होती. मात्र, त्यात तांत्रिक अडचण उद्भवू लागल्याने ती कमी करण्यात आली. यावर्षी ‘नीट’ परीक्षेसाठी ती अट लागू करण्यात आलेली नाही. त्याचा विचार ‘एम्स’कडून व्हावा.
विद्यार्थी हितासाठी सक्ती नकोविद्यार्थी या परीक्षेची वर्षभर तयारी करतात. केवळ एका थंब इंम्प्रेशनबाबतच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी ‘एम्स’ने प्रवेश परीक्षेवेळी या थंब इंम्प्रेशनची सक्ती करू नये, अशी मागणी पालक अशोककुमार शेट्टी यांनी केली आहे. ते म्हणाले, ऐन परीक्षेच्या तणावात अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या आहेत शिवाय ‘थंब इंम्प्रेशन’ची अट त्यांना स्पष्टपणे समजली नाही. अर्ज भरण्याची सुविधा असलेल्या काही यंत्रणांकडून योग्य स्वरूपात मार्गदर्शन झाले नाही. ते लक्षात घेता विद्यार्थी हितासाठी थंब इंम्प्रेशनच्या अटीची प्रवेश परीक्षेसाठी सक्ती करू नये. प्रवेश निश्चितीवेळी त्याची सक्ती करणे योग्य ठरेल. त्यादृष्टीने सरकारने विचार करावा.
सकारात्मक विचार व्हावाबारावीची परीक्षा सुरू असतानाच एम्सच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला. यातील थंब इंम्प्रेशनची पूर्तता केली. मात्र, ते करताना काहीशी शाई अधिक लागल्याने ते नाकारण्यात आले असल्याचे इचलकरंजी विद्यार्थिनी आदिती हिने सांगितले. ती म्हणाली, या अर्जातील दुरुस्तीबाबतचे संदेश ई-मेलद्वारे एम्सकडून पाठविण्यात आले. मात्र, परीक्षेच्या गडबडीत ते पाहता आले नाहीत. काही विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजला नाही. एम्सने विद्यार्थ्यांनी ई-मेलद्वारे पाठविलेले थंब इंम्प्रेशन स्वीकारावे अथवा त्याची सक्ती करू नये.