लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे तो दिवस मराठा समाजासाठी काळा ठरला आहे. याविरोधात मंगळवारी (दि. ११) मराठा समाज बांधवांनी कोरोनाचे नियम पाळून काळी वस्त्रे परिधान करण्यासह दारात काळी गुढी उभारावी, असे आवाहन सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत केले.
मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढून अनेकांनी त्यात बलिदान दिले. आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य शासन कमी पडले. आरक्षण रद्दची घटना समाजासाठी दुर्दैवी असल्याचे सांगितले. खासदार संभाजीराजे व उदयनराजे यांनी या प्रश्नावर एकत्र येऊन दिल्ली दरबारी न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे. याशिवाय राष्ट्रपती व राज्यपाल यांना आपल्या भावना कळविण्यासाठी प्रत्येक घरातून सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले, संतोष सावंत, स्वप्निल पाटील, उत्तम चौगुले, शशिकांत मोहिते, आदी उपस्थित होते.