कोल्हापूर : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा होत असलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘मराठी वाचन सप्ताहा’चे उद्घाटन मध्यवर्ती बसस्थानक येथे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी वाचन सप्ताहाच्या निमित्ताने एस. टी. महामंडळाच्या राज्यभरातील सर्व ५६८ बसस्थानकांवर आजपासून सवलतीच्या दरात मराठी पुस्तक विक्रीची दालने उभारण्यात आली असून येथून पुढे सलग सात दिवस प्रवासी व कर्मचाऱ्याना त्यांच्या आवडीची अनेक पुस्तके, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे मध्यवर्ती बसस्थानक येथे पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन नगरसेवक नियाज खान यांच्या हस्ते करण्यात आले. शेजारी आशिष ढवळे, शैलेंद्र चव्हाण, सुनील जाधव, अतुल मोरे, एस.बी.शिंदे उपस्थित होते.
याबरोबर कवी सुरेश भट यांनी काव्यबद्ध केलेले व संगीतकार कौशल इमानदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘लाभले आम्हास भाग्य... ’ हे मराठी अभियान गीत सर्व बसस्थानकांवर ध्वनिक्षेपित करण्यात आले.या कार्यक्रमाला कोल्हापूर महापालिकेचे माजी परिवहन सभापती नियाज खान, विभाग नियंत्रक शैलेंद्र चव्हाण, आगार व्यवस्थापक सुनील जाधव, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, स्थानकप्रमुख एस. बी. शिंदे यांच्यासह प्रवासी व कर्मचारी उपस्थित होते.