घरातच मारले, गाडीत टाकले, आंबोलीत फेकले..! भडगाव शिक्षक खून प्रकरण -आरोपींवर चप्पलफेक, शिव्यांची लाखोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:01 AM2017-11-30T01:01:42+5:302017-11-30T01:07:51+5:30
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार आप्पय्या गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश आप्पय्या चोथे व विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी हिला सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी आणले होते.
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार आप्पय्या गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश आप्पय्या चोथे व विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी हिला सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. त्यावेळी नातेवाइकांनी दोघाही आरोपींवर कानडी व मराठीतून शिव्यांची लाखोली वाहिली. घरासमोर पोलिसांच्या जीपगाडीत बसलेल्या आरोपींवर एका संतप्त नातेवाईक महिलेने चक्क चप्पल फेकून मारले. विजयकुमार यांना त्यांच्याच राहत्या घरातील बेडरूममध्ये मारून त्यांच्याच ‘ओम्नी’ गाडीतून आंबोलीतील कावळेसादच्या दरीत नेऊन मृतदेह फेकल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
मंगळवारी मृत विजयकुमार यांच्या ‘डीएनए’ चाचणीचा अहवाल मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी त्यांना सावंतवाडीहून गडहिंग्लजला आणण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला, तर कोल्हापूरहून आलेल्या ‘फॉरेन्सिक लॅब’च्या पथकाने घटनास्थळावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले.
दुपारी अडीचच्या सुमारास सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलीस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक आरोपींना घेऊन गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आले. येथील स्थानिक पोलीस कर्मचाºयांसह ते घटनास्थळी रवाना झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी आरोपींना घटनास्थळी फिरवून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर आरोपींना येथील कोठडीत ठेवून दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा केला.
दरम्यान, पोलीस निरीक्षक धनवडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. गुरव यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्येच लोखंडी रॉडने प्रहार करून सुरेश यानेच विजयकुमार यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्याच ओम्नी गाडीतून (एमएच १४ एएम ७७९०) मधून मृतदेह आंबोलीतील कावळेसादच्या दरीत फेकल्याचे त्याने कबुली दिली आहे.
तपास सावंतवाडीकडेच !
खुनाची घटना गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी मृतदेह आंबोलीच्या दरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे अवघ्या २२ दिवसांत खुनाचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या सावंतवाडी पोलिसांकडेच या प्रकरणाचा तपास राहणार आहे.
आरोपींना आमच्या ताब्यात द्या!
आरोपींना आमच्या ताब्यात द्या. आम्हाला फाशी झाली तरी चालेल, परंतु आम्ही यांना सोडणार नाही, असे म्हणत विजयकुमार यांच्या नातेवाइकांनी शिवीगाळ केली.
पोलिसांचा ‘गमिनी कावा’
घटनास्थळी आरोपींना नेल्यानंतरच्या संभाव्य पडसादाची दक्षता म्हणून पोलिसांनी अत्यंत गनिमी काव्याने आरोपींना गुरव यांच्या भडगाव-चिंचेवाडी मार्गावरील ‘आसरा’ बंगल्याच्या आवारात नेले. त्यानंतर लागलीच प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
शिवीगाळ करीत बाहेर आलेल्या संतप्त नातेवाइकांना त्यांनी घराच्या आवारातील बाजूच्या ‘शेड’मध्ये बसविले. त्यानंतर पहिल्यांदा सुरेशला व नंतर जयलक्ष्मी हिला घरात फिरवून त्यांच्याकडून माहिती घेतली.त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. अगदी पत्रकारांनाही गेटबाहेरच थांबविण्यात आले होते.
चार थेंब रक्तामुळे
कावळेसाद पॉर्इंटनजीकच्या लोखंडी रिलिंगनजीक मृतदेह ठेवून तो दरीत फेकण्यात आला. त्यावेळी त्याठिकाणी पडलेल्या रक्ताच्या चार थेंबांमुळे ‘डीएनए’ चाचणीद्वारे मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर घटनास्थळ पाहणीवेळी गुरव यांच्या बेडरूमखालीदेखील रक्ताचे डाग आढळून आले. त्याचेही नमुने पथकाने घेतले आहेत.
खुनावेळी मुले हॉलमध्ये
विजयकुमार यांचा बेडरूममध्ये खून केला त्यावेळी त्यांची तीनही मुले हॉलमध्ये झोपलेली होती, अशी माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बंगल्यातील ‘ओम’ लिहिलेल्या त्या हॉलशेजारीच ‘श्री’ लिहिलेले बेडरूम आहे. याच ठिकाणी हे कुकर्म घडले.