माउलींची पालखी यंदा सोशल मीडियावर ‘लाईव्ह’
By admin | Published: June 29, 2016 12:51 AM2016-06-29T00:51:23+5:302016-06-29T00:53:04+5:30
‘चला वारीला’ टीमचा उपक्रम : प्रत्येक क्षणाचे मिळणार अपडेटस्
संतोष तोडकर-- कोल्हापूर --माउलींच्या सहवासाची आणि विठुरायाच्या भक्तीची आस बाळगून राज्यभरातून लाखो वैष्णवजन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये दरवर्षी दाखल होतात; परंतु ज्यांना या सोहळ्यात सहभागी होता येत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांनी एकत्र येऊन ‘चला वारीला’ हे फेसबुक पेज सुरू केले आहे. याद्वारे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स भाविकांना घरबसल्या मिळणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १८६ व्या आषाढी पायी वारी सोहळ्यास मंगळवारपासून आळंदी येथून सुरुवात झाली. ही वारी १४ जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. सोशल मीडियाच्या वारीत फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंगसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, पालखी सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स लगेच पेजवर अपलोड केले जाणार आहेत. तसेच दिंडी परंपरा, वारकरी संप्रदाय, वारीतील अनेक प्रसंग, प्रस्थान, रिंगण धावा आणि परंपरा यांची माहिती, व्हिडिओ क्लिप्स व छायाचित्रे यांचा वापर करून दिली जाणार आहे. ही संकल्पना अविनाश सूर्यवंशी व सागर गंधारी यांची आहे.
यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुण एकत्र आले आहेत. यामध्ये श्रीकांत भेंडे, आशिष तोमर, गौरीश सोनार, श्रीराम बडवे, संतोष देशपांडे, प्रकाशराजे कुंभार, अवी दास, सागर घोटेकर, विनायक वेंगपल्ली, अभिषेक कुंभार, महेश ढाकणे, धनंजय कोकाटे, शिवराज माने, विनायक चिखलगे, आदींचा समावेश आहे.
असा घ्या अनुभव :
वारी अनुभवण्यासाठी फेसबुकच्या ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ूँं’ं६ं१्र’ं या लिंकवर जाऊन पेज ‘लाईक’ केल्यास माउलींच्या पालखी सोहळ्याचा प्रत्येक क्षण आपल्या टाईमलाईनवर आपोआप अपडेट होत राहील.
वारी ही देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जात, पात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन तिचे महत्त्व आहे. डिजिटल युगामध्ये घरबसल्या दर्शन घेता यावे व एकतेचा सोहळा पाहता यावा या हेतूने ‘चला वारीला’ या पेजची निर्मिती केल आहे.
- अविनाश सूर्यवंशी, संकल्पक, चला वारीला.