निलोफर आजरेकरच १५ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:53 PM2020-09-17T13:53:19+5:302020-09-17T13:56:23+5:30
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहेत. आता दोन महिन्यांसाठी बदल करणे शक्य नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे त्या संदर्भातील हालचाली थांबल्या.
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहेत. आता दोन महिन्यांसाठी बदल करणे शक्य नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे त्या संदर्भातील हालचाली थांबल्या.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पूर्वी, सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित होते, परंतु राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलेला असल्याने कोणतीही निवडणूक घेण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने देखील यासंदर्भात कोणतीही अधिसूचना काढलेली नाही.
मार्च महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची साथ ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आटोक्यात येईल, या अपेक्षेने निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून कार्यालयात बसून जी कामे करता येणे शक्य आहेत ती करावीत, असे निवडणूक आयोगाने कळविले होते.
ती कामे प्रशासनाने केली आहेत, परंतु मतदारयाद्या तयार करणे, आरक्षणे टाकणे, प्रभाग रचना यासारखी गर्दी होणारी, परंतु महत्त्वाची कामे करण्यात आलेली नाहीत. म्हणूनच १५ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नियुक्तीचा एकमेव पर्याय राहतो.
१६ नोव्हेंबरपासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात जाणार हे स्पष्ट आहे. प्रशासक कोण होणार हाच आता उत्सुकतेचा मुद्दा आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सेवा जेमतेम एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच प्रशासक म्हणून कार्यभार सोपविला जाऊ शकतो.
महापौर निवडणूक घेण्याच्या मध्यंतरी जोरदार हालचाली सुरू होत्या. दोन अडीच महिन्यांसाठी ही संधी दीपा मगदूम यांना देण्याचे ठरले होते, परंतु महापौर निवडणूक ऑनलाईन घेणे शक्य नसल्याने त्याला नगरविकास खात्याची परवानगी मिळाली नाही. निलोफर आजरेकर याच आता १५ नोव्हेंबरपर्यंत महापौर पदी राहणार आहेत.