कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर १६ जूनच्या आंदोलनाच्या तयारीसाठी आज, गुरुवारी खासदार संभाजीराजे यांनी सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक आयोजित केली आहे. दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृहात ही बैठक होत असून, समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फत्तेसिंह सावंत व अमर पाटील यांनी पत्रकातून केली आहे.
मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला ६ जूनचा अल्टिमेटम दिला होता. या कालावधीत राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने ६ जून रोजी राज्याभिषेकदिनी संभाजीराजे यांनी १६ जून राेजी कोल्हापुरात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून, १६ जून रोजी मोर्चा काढायचा तर त्याचे रणनीती व इतर बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी संभाजीराजे यांनी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये संभाजीराजे मार्गदर्शन करणार असून त्यानुसारच आंदोलनाची दिशा निश्चित होणार आहे. तरी बैठकीला समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फत्तेसिंह सावंत व अमर पाटील यांनी पत्रकातून केले आहे.