अर्जुनवाडा, नंद्याळ परिसरातील ऊस पिकावर लष्करी अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:42+5:302021-05-23T04:23:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्याला गेल्या महिन्यात जोरदार गारपिटीने झोडपून काढले. यातून शेतकरी सावरण्याआधीच नंद्याळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्याला गेल्या महिन्यात जोरदार गारपिटीने झोडपून काढले. यातून शेतकरी सावरण्याआधीच नंद्याळ व अर्जुनवाडा ( ता. कागल) परिसरातील ऊस पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गारपिटीने कलिंगड, काकडी, मिरची, दोडका आदी भाजीपाल्यासह ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी व पंचनामे झाले; पण अजून प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. यातून शेतकरी सावरतोय, तोच लष्करी अळीने या परिसरातील ३०० एकर ऊस पिकावर आक्रमण केले आहे. यातील शंभर ते दीडशे एकर ऊस पीक दोन दिवसांत फस्त केले आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी आर. जी. पाठक, कीटक शास्त्रज्ञ नितीश घोडके, एन. एस. महाडिक, मंडल कृषी अधिकारी अनिकेत माने, कृषी सहायक सुनील बुगडे, सरपंच प्रदीप पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी औषधांचा पुरवठा केला. एकाचवेळी सायंकाळी चारनंतर शेतकऱ्यांनी औषध फवारणी करावी, जेणे करून या अळीच्या पादुर्भावावर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल.
फोटो:-
नंद्याळ व अर्जुनवाडा (ता. कागल) येथील लष्करी अळीचा पादुर्भाव झाल्याने ऊस पिकाची पाहणी करताना जिल्हा व तालुका कृषी विभागाचे अधिकारी.