विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाच्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात अंडी व पिल्ले विक्रीत ढपला पाडला जात आहे. या व्यवहारातून वर्षाला किमान सात लाखांहून अधिक रक्कम हातोहात मारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार आल्यावर अधिक चौकशी केली असता, असा व्यवहार घडत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. त्यामुळे या व्यवहाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.या केंद्रात अंडी व पिल्लांची विक्री असा उत्पन्नाचा दुहेरी मार्ग आहे.
आठवड्याला ९४०८ अंडी उबविली जातात. त्यासाठी दोन मशिन्स आहेत. हे काम पावसाळ्यात तीन महिने बंद असते. फाऊंडेशन स्टॉक वर्षाला विकला जातो. प्रत्येक गुरुवारी एका दिवसाची आठ हजार पिल्ले प्रत्येकी २० रुपयांप्रमाणे विकली जातात. उबविण्याचे अंडे ११ रुपयांस विकले जाते. प्रजननासाठी आठ कोंबड्यामागे एक नर ठेवला जातो. कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद व नागपूरला अशी केंद्रे आहेत. हे केंद्र येथे १९६४ पासून आहे. त्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पिल्ले पुरवितात.
गतवर्षात या केंद्रात पाच लाख ३९ हजार ५२९ अंडी व एक लाख ४५ हजार १८० पिल्लांचे उत्पादन झाले. त्याच्या विक्रीतून केंद्रास ६२ लाख २९ हजार ८४३ रुपये मिळाले. त्यातील ६० लाख रुपये या पिल्लांच्या खाद्यावरच खर्च झाले. या केंद्राचा कारभार पती-पत्नी असलेल्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे तिथे काय चालते हे बाहेर कळू दिले जात नाही. कुक्कुटपालन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा या कामासाठी वापर केल्याच्या तक्रारी आहेत.असा होतो व्यवहार१ आठवड्याला ९४०८ अंडी उबविली जातात. त्यातील ८३०० पिल्ले जन्माला येतात. प्रत्यक्षात ७५०० पिल्ले जन्माला आली, असे दाखविले जाते. एका पिल्लाची किंमत २० रुपये असते. त्यामध्ये महिन्याला ४० हजार रुपये डल्ला मारला जातो.२ रोज १०० अंड्यांचे उत्पादन कमी दाखविले जाते. एका अंड्याची किंमत ११ रुपये आहे. त्यातून दरमहा ३० हजार रुपये काढले जातात. अशी विक्री सहा महिने सुरू असते.३ चार हजार नरपक्षांची विक्री वर्षातून एकदा होते. त्याचा शासकीय दर नगास १०० रुपये असा आहे. पिल्लू ९ ते १० आठवड्यांचे असेल तर दर ८२ ते ८५ रुपये असतो. विक्री ११० रुपयांनी करायची व पावती ८२ रुपयांनी केली जाते. त्यातून ८० हजार मिळतात.४ फाऊंडेशनचे नर पक्षी १० हजार असतात. त्यांची मर होते म्हणून ५०० ते एक हजार जास्त सोडतात; परंतु ते कागदावर येत नाहीत. एका पक्षाचा दर १०० रुपये असतो. त्यातून ५० हजार रुपये बाजूला निघतात.५ फाऊंडेशनचे चार हजार पक्षी वर्षाला विकतात. त्याचा दर ७५ रुपये किलो आहे. प्रत्यक्षात ही विक्री २०० रुपयांपर्यंत किलो दराने होते व कागदोपत्री १६० रुपये दाखवून दीड लाखापर्यंत डल्ला मारला जातो.