कोल्हापूर : पापाची तिकटी चौकातील वाहतूक बेट विकसित करणे आणि महापालिकेच्या स्मशानभूमीस शववाहिका खरेदी करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी सोमवारी महापौर सरिता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे दिले.पापाची तिकटी चौकातील (प्रभाग क्र. ३१, बाजारगेट) वाहतूक बेट विकसित करण्यासाठी १० लाख रुपये आणि महानगरपालिकेच्या स्मशानभूमीसाठी शववाहिका खरेदीसाठी १५ लाख रुपये असा एकूण सुमारे २५ लाख रुपये निधी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून खर्च करावा, त्या कामाचे अंदाजपत्रक शहर अभियंत्यांकडून मागवून घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आमदार क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिला आहे.
त्याबाबतचे पत्र त्यांनी सोमवारी महापौर सरिता मोरे, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्याकडे दिले. यावेळी सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका हसिना फरास, ईश्वर परमार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे उपस्थित होते.